व्हिजा संपल्यानंतरही नायजेरियन नागरिकांचे बेधडकपणे वास्तव्य, नवी मुंबईत दोन कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:50 AM2023-09-02T04:50:55+5:302023-09-02T04:51:10+5:30
शुक्रवारी एकाच वेळी अचानक परिमंडळ १ व २ मध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक नायजेरियन व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली.
नवी मुंबई : ड्रग्ज विक्रीमध्ये सहभागी नायजेरियन नागरिकांचा शोध घेताना नवी मुंबई पोलिसांनी च्या ज्या परिसरात जेवढ्या नायजेरियन नागरिक राहायला असतील त्यापेक्षा अधिक पुरुष व महिला पोलिसांचे संख्याबळ तैनात केले होते.
शुक्रवारी एकाच वेळी अचानक परिमंडळ १ व २ मध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक नायजेरियन व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यात ड्रग्ज विक्रीशी संबंधित, बनावट कागदपत्रे, व्हिजा संपल्यानंतरही वास्तव्य अशा कारणांनी ७५ नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीत, घर झडतीमध्ये दोन कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज आढळून आले आहे. त्यात ७०० ग्रॅम कोकेन, ३०० ग्रॅम एमडी व ३०० ग्रॅम ट्रॅमडॉल या ड्रग्जचा समावेश आहे.
आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मास्टर सर्जिकल स्ट्राईक प्लॅननुसार गुन्हे शाखा व दोन्ही परिमंडळाच्या पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली. आयुक्त भारंबे यांनी पदभार घेताच, अमली पदार्थमुक्त नवी मुंबईसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यानुसार थर्टी फर्स्टच्या रात्री खारघर येथे कारवाई करून १६ नायजेरियन ड्रग्ज विक्रेत्यांना एकाच ठिकाणावरून अटक केली होती. तेव्हापासून नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीमध्ये सक्रिय असलेल्या नायझेरियन व्यक्तींवर पाळत ठेवली जात होती. अखेर शुक्रवारी दिवसभर त्यांच्या राहत्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.