नायजेरियनच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 03:18 AM2019-10-26T03:18:47+5:302019-10-26T03:19:49+5:30
नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १५ ऑक्टोबरला मध्यरात्री जोसेफ या नायजेरियनचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तुळींज पोलिसांनी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती.
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १५ ऑक्टोबरला मध्यरात्री जोसेफ या नायजेरियनचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तुळींज पोलिसांनी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पोलीस शोध घेत होते.
महापालिकेच्या रूग्णालयात शवविच्छेदन करताना डॉक्टरांना न कळल्याने त्याचा व्हीसेरा काढून जे. जे. रूग्णालयात पाठवला. वैद्यकीय अधिकारी यांनी जोसेफ याला मारहाण झाल्यामुळेच मृत्यू झाला असल्याचे सांगितल्यानंतर तुळींज पोलिसांनी गुरु वारी हत्येचा गुन्हा दाखल केला.
जोसेफ कुठे राहतो, त्याचे कुणी साथीदार आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरून आजूबाजूच्या परिसरातील अनेक नायजेरियन घरांना कुलूप लावल्याचे पोलिसांना आढळले. ही हत्या कुणी व का केली याचा गुंता सोडवण्याचेही आव्हान समोर उभे टाकले आहे.
नेमकी काय होती घटना?
नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये राहणारा जोसेफ या तरूणावर काही अनोळखींनी हल्ला केला. त्याला उपचारासाठी पालिका रूग्णालयात नेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याने व त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर संतापलेल्या ६ ते ७ नायजेरियन लोकांनी त्याच रात्री अडीचच्या सुमारास नगीनदास पाडा, प्रगतीनगर, ९० फुटी रोड या परिसरातील ५० ते ६० वाहनांचे नुकसान केले होते. २ ते ३ जणांना मारहाण केली होती. तुळींज पोलिसांनी मारहाणीचा आणि अपघाती मृत्यू असे दोन गुन्हे १६ आॅक्टोबरला दाखल केले होते.