नायजेरियन ड्रग्ज तस्कराला बेडया, कारवाईदरम्यान NCB चे दोन अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:42 PM2021-08-06T22:42:26+5:302021-08-06T22:42:34+5:30
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेड़े यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथील सेक्टर ३० येथे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती मिळाली.
मुंबई : कोकेनच्या कोलंबिया ते मुंबई व्हाया ईथोपिया या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा सक्रिय सदस्य असलेल्या नायजेरीयन ड्रग्ज तस्कराला राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नवी मुंबईतून शुक्रवारी पहाटे बेडया ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १०२ ग्रँम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेड़े यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथील सेक्टर ३० येथे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून स्टिफन सँम्युअल उर्फ टोनी याला ताब्यात घेतले. त्याच्याकड़ून १०२ ग्रँम कोकेन जप्त करण्यात आले आहे. टोनी हा कोकेनच्या कोलंबिया ते मुंबई व्हाया ईथोपिया या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा स्टीपन हा सक्रीय सदस्य आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीच्या रडारवर होता. कोकेनच्या कोलंबिया ते मुंबई व्हाया ईथोपिया या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा स्टीपन हा सक्रीय सदस्य आहे. एनसीबीचे पथक गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि दिल्ली येथे त्याचा शोध घेत होते. तो नुकताच दिल्लीवरून मुंबईत कोकेनचा पुरवठा करण्यासाठी आला होता. अखेर तो एनसीबीच्या हाती लागला.
यावेळी अटकेला विरोध करत स्टीपनने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. यात स्टीपन विरुद्ध सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एनसीबीचे पथक अधिक तपास करत आहेत
२२ परदेशी ड्रग्ज तस्कर जाळयात
एनसीबीने आता पर्यंत यावर्षी जानेवारीपासून २२ परदेशी ड्रग्ज तस्करावर कारवाई केली आहे