अटकेच्या आदल्या रात्री साहिलनं हत्येचं रहस्य उघडलं; ऐकून नवविवाहित बायको हादरली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 02:44 PM2023-02-16T14:44:37+5:302023-02-16T15:15:24+5:30
जेव्हा दिल्ली पोलिसांकडून साहिलवर दबाव येऊ लागला तेव्हा तो घाबरला होता असं पोलिसांनी कोर्टात सांगितले.
नवी दिल्ली - निक्की हत्याकांडातील आरोपी साहिल गहलोतला कोर्टाने बुधवारी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निक्कीची हत्या करून साहिलने ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह ठेवला होता त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. निक्कीच्या हत्येचं रहस्य आरोपी साहिलने लग्नानंतर ३ दिवसांपर्यंत लपवून ठेवले होते. मात्र अटकेच्या आदल्या रात्री साहिलने त्याच्या पत्नीसमोर हे गूढ उकललं असं पोलिसांनी कोर्टात म्हटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा दिल्ली पोलिसांकडून साहिलवर दबाव येऊ लागला तेव्हा तो घाबरला होता. त्याने नव्या नवरीला निक्कीच्या हत्येबद्दल सांगितले आणि त्यानंतर तिला माहेरी जा असं म्हटलं. निकटवर्ती गावाच्या विधवा महिलेच्या एकलुती एक मुलीसोबत डिसेंबर २०२२ मध्ये साहिलच्या लग्नाची बोलणी झाली होती. लग्नाची तारीखची निश्चित झाली. दोघांच्या कुटुंबाने १० फेब्रुवारीला लग्न करायचं ठरवलं. लग्नाच्या दिवशी सकाळी साहिलने निक्की यादवची हत्या केली होती. त्यामुळे त्याच्या मनात अन्य विचार घोंगावत होते.
मात्र, लग्नानंतर तीन दिवस त्याने पत्नीला याबाबत काहीही सांगितले नाही. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच नजफगडच्या बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पहिल्या दिवसापासून साहिलचा शोध घेत होते. पोलिसांचा दबाव वाढल्यावर १३ फेब्रुवारीच्या रात्री साहिलने पत्नीला सांगितले की, मी एका मुलीची हत्या केली आहे त्यामुळे तू माहेरी जा. नवविवाहित महिलेने मंगळवारी सकाळी आईला फोन करून सर्व प्रकार सांगितला. विधवा आईने कुटुंबातील आणि शेजारच्या काही लोकांना मुलीच्या सासरी पाठवले. याठिकाणी दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर ठरल्याप्रमाणे लोकांनी मुलीसाठी दिलेला हुंडा आणि मुलीला घेऊन परत आले.
साहिलच्या विश्वासघातामुळे आई-लेकीला बसला धक्का
लग्नानंतर काही काळ त्रास सहन करत असलेली आई आणि मुलीला या प्रकाराचा खुलासा होताच धक्का बसला. मुलीच्या वडिलांचे सुमारे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून आई-मुलगी कष्टाने जगत होत्या. कधी आई आपल्या मुलीला घेऊन माहेरी जायची तर कधी ती गावातच राहायची. गेल्या अनेक वर्षांपासून आई व मुलगी दूध विकून आयुष्य जगत होत्या. गावातील सरकारी शाळेत शिकून मुलगी बारावी उत्तीर्ण झाली. पैसे जमा करून आईने मुलीचे लग्न साहिलसोबत केले. आता पुन्हा आईला मुलीच्या भवितव्याची चिंता लागली आहे.