ईडीच्या कारवाईबाबत निलांबरीचे रहिवाशी अनभिज्ञच; ‘त्या’ ११ सदनिकांची माहितीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 09:13 PM2022-03-22T21:13:24+5:302022-03-22T21:14:41+5:30
Ed Action :जप्त केलेली मालमत्ता ६.४५ कोटींची आहे. यामध्ये नीलांबरीमधील ११ सदनिकांचा समावेश आहे.
ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांशी निगडीत असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील निलांबरी प्रोजेक्टच्या ११ सदनिकांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सील ठोकल्याचे जाहीर केले. मात्र या कारवाईबाबत इमारतीमधील रहिवाशी अनभिज्ञच होते. शिवाय, या ११ सदनिकांना संबंधित ईडीचे कोणतेही सील लागले नसल्याने ही कागदोपत्री कारवाई असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर इडीने ही कारवाई केली. जप्त केलेली मालमत्ता ६.४५ कोटींची आहे. यामध्ये नीलांबरीमधील ११ सदनिकांचा समावेश आहे.
या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहे. याच इमारतीमध्ये २४ व्या मजल्यावर श्रीधर पाटणकर यांचे कार्यालय आहे. ही इमारत पाटणकर आणि जोशी या दोघांच्या संयुक्त मालकीची असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. म्हाडाच्या पुनर्विकास योजनेतून तिचे बांधकाम झाले. २०१५ मध्ये इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर २०२१ मध्ये तिचे काम पूर्ण झाले. गेल्या सहा महिन्यांपासून रहिवाशांना ताबा देण्यास सुरु वात झाली आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त
कारवाई ठाकरे सरकारला हादरा देणारी!
ईडीने कागदोपत्री ही कारवाई केलेली असल्यामुळे याठिकाणी मंगळवारी सायंकाळी कारवाई करणारे अधिकारी पोहचले नव्हते. सदनिका सील करण्याच्या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल, त्यावेळी हे अधिकारी घटनास्थळी दाखल होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई ठाकरे सरकारला हादरा देणारी ठरली आहे.