आचोळे येथे एकाच घरात आढळली साडेनऊ लाखांची वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 07:35 PM2020-01-18T19:35:36+5:302020-01-18T19:38:39+5:30
पालघरच्या भरारी पथकाची कारवाई
कल्याण - वसई-विरार महापालिका हद्दीतील आचोळे येथे एकाच घरात साडेनऊ लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली आहे. पालघर येथील महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून ही वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधित वीज ग्राहक सुदाम रामचंद्र पाटील यांना चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
महावितरणच्या पालघर भरारी पथकाने १० जानेवारीला आचोळे गाव परिसरातील चिमघर येथे सुदाम रामचंद्र पाटील यांच्या घरातील मीटरची तपासणी केली. वीज खांबावरून आलेली केबल वीज मीटरमधून जोडण्याऐवजी ४ कोअर केबलचा वापर करून घरात विजेचा परस्पर वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले. टॅपिंगच्या माध्यमातून पाटील यांनी ४२ हजार ८१२ युनिट वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर कारवाई सुरु असताना पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी भरारी पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु भरारी पथकाने पोलिसांची मदत घेऊन उर्वरित कार्यवाही पूर्ण केली. चोरीच्या विजेचे साडेनऊ लाख रुपयांचे बिल भरण्याची नोटीस पाटील यांना बजावण्यात आली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महावितरणकडून सुरु आहे.
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक दत्तात्रय शिंदे (भापोसे) व उपकार्यकारी संचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंताविनय सिंह, सहायक अभियंता कुणाल पिंपळे, सहायक दक्षता अधिकारी प्रशांत भोये व विशाखा राजूरकर, कर्मचारी महेश कातखेडे यांनी ही कारवाई केली. वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरी हा अजामीनपात्र गुन्हा असून तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.