वसईमध्ये अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:43 AM2021-02-03T01:43:16+5:302021-02-03T01:43:46+5:30
नालासोपारा, वालीव, वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात शनिवारी आणि रविवारी अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली.
नालासोपारा - नालासोपारा, वालीव, वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात शनिवारी आणि रविवारी अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यात या गर्दुल्ल्यांच्या अनेक तक्रारी येत असून पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सातही पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग वाढवले आहे.
शनिवारी संध्याकाळी नायगावच्या चंद्रपाडा येथील मोकळ्या जागेत राम पाल (४२), सातिवली येथील तलावाजवळ भानू बेनबन्सी (२०) आणि धानिवबाग येथील तलावाजवळ कमलेश यादव (३५) हे तिघे अमली पदार्थ घेत असताना त्यांना वालीव पोलिसांनी अटक केली. रविवारी संध्याकाळी नालासोपारा पश्चिमेतील विमल रेसिडेन्सी या बिल्डिंगच्या मागे शुभम ठाकूर (२४) आणि हनुमाननगरच्या मैदानात मुथ्थुक्रिश्न आनंदराज (२४) या दाेघांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली. तर वसई पोलिसांनी कोळीवाडा आणि सुरूच्या बागेत अमली पदार्थ घेणाऱ्या चौघांना रविवारी अटक केली. अहमद पटेल (२२), उस्मान शेख (२१), प्रतीक राठोड (१९) आणि मन्नू खान (२२) हे अमली पदार्थांचे सेवन करताना आढळले. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन जणांना अमली पदार्थ घेताना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अशीच सुरू असून अमली पदार्थमुक्त शहर करायचे असल्याचे नालासाेपारा पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
भंगार गाड्या बनल्या गर्दुल्ल्यांचा अड्डा
वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील शहरांमध्ये अनेक रस्त्यांच्या किनाऱ्यालगत मोठमोठ्या भंगार वाहनांमध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. रात्री याच गाड्यांमध्ये बसून हे गर्दुल्ले नशा करीत असतात. ते रात्रीच्या वेळी लोकांनाही लुटतात. विराेध केल्यास जीवघेणा हल्लाही करत असल्यामुळे त्यांची शहरात दहशत आहे.