नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी चौघांची नऊ तास कसून चौकशी; एडलवाईज समूहाचे अध्यक्ष हायकोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 07:33 AM2023-08-09T07:33:52+5:302023-08-09T07:34:08+5:30
पुन्हा ११ ऑगस्टला हजर राहण्याची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस देण्यात आली. त्यानंतर विविध मुद्द्यांवरील माहिती रायगड पोलिसांनी मागविवली होती. त्यानुसार मंगळवारी कंपनीचे व्यवस्थापक संचालक फणीद्रनाथ काकर आणि इतर तीन पदाधिकारी खालापूर पोलिस ठाण्यात हजर झाले. रायगड पोलिसांनी नऊ तास त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून चौकशी केली.
दरम्यान, माहिती अपूर्ण आणि विस्तृत स्वरूपात हवी असल्याने पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. ११ ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले असल्याचे अपर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी तक्रार केली होती.
एडलवाईज समूहाचे अध्यक्ष हायकोर्टात
नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याने एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे समूह अध्यक्ष व एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
रशेष शहा हे एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष आहेत तर राजकुमार बन्सल हे एडलवाईज रिकन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी सोमवारी न्या. नितीन सांबरे व न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.
चौकशीला स्थगिती द्यावी, तसेच पोलिसांना कोणतीही कठोर कारवाई करण्यास मनाई करावी, अशी अंतरिम मागणी याचिकादारांनी केली आहे तसेच गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकादारांनी केली आहे. देसाई यांनी २ ऑगस्टला त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओमध्येच गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या परिस्थितीबाबत देसाई यांनी काही व्हॉईस नोट तयार केल्या. ४ ऑगस्टला देसाई यांच्या पत्नी नयना यांनी खालापूर पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्याप्रकरणी तक्रार नोंदविली.
आरोपींनी देसाई यांच्यावर थकीत कर्जाची, वसुली करण्यासाठी दबाव आणला आणि थकबाकीमुळे त्यांचा कर्जत येथील एनडी फिल्म वर्ल्ड स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. देसाई यांच्या एनडीएज आर्ट वर्ल्ड प्रा. लि. विरुद्ध काॅर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू केल्यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचे तोडगा काढण्याच्या कामासाठी कोठारी यांची नियुक्ती केल्याचे नयना यांनी म्हटले आहे.