Nirbhaya Case : दोषी विनयने तुरुंगात केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 04:18 PM2020-01-17T16:18:36+5:302020-01-17T16:21:40+5:30
कारागृह महासंचालक संदीप गोयल यांनी या घटनेबाबत दुजोरा दिलेला नाही.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगात शौचालयात गळ्याला फास आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला. विनयला २४ तासांसाठी वैद्यकीय देखरेख कक्षात ठेवण्यात आले आहे. तुरुंगात सीसीटीव्ही फुटेज आणि कडक बंदोबस्त असतानाही विनयने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार बुधवारी सकाळी झाल्याचे विनय शर्माचे वकील ए.पी.सिंह यांचा दावा आहे. मात्र तुरुंगातील सुरक्षारक्षकांनी त्याला वाचवले आहे. मात्र, कारागृह महासंचालक संदीप गोयल यांनी या घटनेबाबत दुजोरा दिलेला नाही.
निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
फाशीची शिक्षा जाहीर झाल्यापासून विनय अस्वस्थ आहे. त्याची झोप उडाली आहे. तो आपल्या बॅरॅकमध्ये सारखा बेचैन होऊन फिरत असतो. त्याची ही परिस्थिती पाहता कारागृह अधिकाऱ्यांनी त्याचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली. २४ तास डॉक्टरांच्या देखरेदीखीखाली विनय असून तो ज्यावेळी जेल क्रमांक ४ च्या सिंगल रूममध्ये होता. त्यावेळी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. विनयने शौचालयात कपड्यांचा फास बनवून स्वतःला लटकवून घेतले. फास पाच ते सहा फूट उंचीवर असल्याने तो लटकू शकला नाही. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगात शौचालयात गळ्याला फास आवळून आत्महत्येचा केला प्रयत्न https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 17, 2020
गुरुवारी निर्भयाच्या दोषींना फाशी घरापासून काही अंतरावर असलेल्या सिक्युरिटी सेलमध्ये हलविण्यात आले. आता दोषींना जेल क्रमांक ३ मध्ये पाठविण्यात आले आहे. जेल क्रमांक ३ मध्ये दोषींना पाठविण्यात आल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावर तणाव पाहायला मिळत आहे. हाय सिक्युरिटी सेलमध्ये दोषी २४ तास सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली राहतील. कारागृह अधिकाऱ्याने सांगितले की, विनय जेल क्रमांक ४ तर अक्षय, पवन आणि मुकेश हे जेल क्रमांक २ मध्ये कैद होते. कोर्टाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांना जेल क्रमांक ३ या अतिसुरक्षित सेलमध्ये हलविण्यात आले. जेल क्रमांक ३ मध्येच फाशी देण्याचे ठिकाण आहे. या दोषींच्या देखरेखीसाठी तामिळनाडूच्या विशेष पोलीस दलाचे दोन - दोन जवान २४ तास तैनात असणार आहेत. सुरक्षारक्षकांना दोषींजवळ सहा तासांहून अधिक वेळ राहण्याची परवानगी नाही.