फाशीचे तख्त तयार; निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकाच वेळी फासावर लटकवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 07:34 PM2020-01-01T19:34:11+5:302020-01-01T19:40:08+5:30
आता ४ तख्त तयार करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारात चार दोषींना शिक्षा देण्यासाठी तयार केली आहे. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्र फाशी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. आता तिहार कारागृह हे देशातील पहिले कारागृह असणार आहे, जेथे एकाच वेळी चार दोषींना फासावर एकाच वेळी लटकविण्यासाठी फाशीचे तख्त तयार केले जात आहेत. आतापर्यंत येथे फाशी देण्याकरिता एकच तख्त तयार करण्यात आले होते, परंतु आता ४ तख्त तयार करण्यात आले आहे.
तिहार कारागृहाच्या आत तख्त तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केले. हे काम पूर्ण करण्यासाठी कारागृहामध्ये जेसीबी मशीन देखील आणली होती, असे तिहार कारागृहाच्या सूत्रांनी सांगितले. अशी माहिती आजतकने दिली आहे. या जेसीबीच्या सहाय्याने फाशी देण्यासाठी अतिरिक्त तीन तख्त तयार करण्यात आले असून सुरुंग (बोगदा) देखील तयार करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाशीच्या तख्ताखाली बोगदा बनविला जातो. फासावर लटकविलेल्या दोषीचा मृतदेह या बोगद्यातून बाहेर काढला जातो.
६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशीवर चढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पटियाला हाऊस कोर्टात ७ जानेवारी रोजी अक्षय, पवन, विनय आणि मुकेश यांच्या दोषी फाशीच्या डेथ वॉरंटवर सुनावणी होणार आहे. दोषींनी तिहार कारागृह प्रशासनाला क्यूरेटिव याचिका दाखल करण्यासाठी पत्र लिहिले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, १९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली होती. क्यूरेटिव अर्ज एका महिन्यात करता येतो. नंतर दया याचिका हा शेवटचा पर्याय असतो. मात्र, निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरण हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असून या चार आरोपींना फाशीपासून सुटकेची काही आशा करता येत नाही.