निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : ज्या दिवशी दोषींनी दुष्कर्म केले त्याच दिवशी फासावर लटकविणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 14:53 IST2019-12-10T14:52:19+5:302019-12-10T14:53:47+5:30
Nirbhaya Gang Rape Case : अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : ज्या दिवशी दोषींनी दुष्कर्म केले त्याच दिवशी फासावर लटकविणार?
नवी दिल्ली - दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ ला झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी पवन गुप्ता याला मंडोली तुरुंगातून दिल्लीच्या तिहार तुरुंगात हलविण्यात आले असून तिहारमध्ये फाशीची ट्रायल देखील घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याची शक्यता आहे.
हैदराबाद सामूहिक बलात्कारात चार आरोपींच्या एन्काऊंटरनंतर निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान,विनय शर्मा याने फाशीपासून सूट मिळावी म्हणून दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी ही दया याचिका गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली होती. राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली. नंतर विनय शर्माने दयेची याचिका मागे घेतली. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी धावत्या बसमध्ये झालेल्या निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर तिच्यावर भयंकर अत्याचार केले होते.
बलात्कारानंतर अकरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. बस चालक राम सिंह या दोषीने ट्रायलदरम्यान तुरुंगातच आत्महत्या केली. उरलेल्या मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्भयाला तब्बल सात वर्षानंतर न्याय मिळू शकेल.