‘निर्भया’ला मिळाला न्याय! नराधमाला फाशीची शिक्षा; साडेसहा वर्षांच्या चिमुकलीचे खून प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:03 AM2024-03-23T09:03:14+5:302024-03-23T09:03:41+5:30
विशेष न्यायालयाचा निकाल; मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील अवघ्या साडेसहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करत तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पुण्याच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी या गंभीर गुन्ह्यात नराधमाला फाशीची शिक्षा सुनावून ‘निर्भया’ला न्याय दिला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले; पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. मी हा गुन्हा केलाच नाही, असे आरोपी सांगत होता. न्यायालयाने त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची जलद गतीने सुनावणी घेऊन विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (२४) असे फाशी झालेल्या नराधमाचे नाव आहे, तर सुजाता महिपती दळवी (वय ४८, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, मावळ) असे त्याच्या आईचे नाव आहे. याबाबत चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ती खेळत होती आणि...
- ही घटना २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली होती. त्या दिवशी नागपंचमीनिमित्ताने शाळेला सुट्टी असल्याने चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात शोधाशोध सुरू झाली. पोलिसांनी गावात शोधमोहीम राबविली. दुसऱ्या दिवशी (३ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडुपात मुलीचा मृतदेह आढळला.
- तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून चोवीस तासांत चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण २९ साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे ॲड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.
- मुख्यमंत्र्यांच्या मदतीची प्रतीक्षाच
- या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
- त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ ऑगस्ट २०२२ रोजी पीडितेच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, अद्यापही ही मदत मिळाली नसल्याचे ‘निर्भया’चे वडील जनार्दन अनंत चांदेकर यांनी सांगितले.
- आमची ‘ती’ एकुलती एक मुलगी होती. लग्नानंतर आम्हाला चार वर्षांनी मुलगी झाली. ‘ती’ नाही याचे दु:ख न विसरण्यासारखे आहे. आज तिला न्याय मिळाला, याचे समाधान आहे, अशी भावना देखील चांदेकर कुटुंबियांनी दिली.