Nitesh Rane Pre Arrest Bail Plea: नितेश राणेंना अटकपूर्व जामिन की अटक? युक्तीवाद उद्यावर गेला, आज काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 07:26 PM2021-12-28T19:26:22+5:302021-12-28T19:27:42+5:30
Nitesh Rane Pre Arrest Bail Plea updates: शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष परब याला मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष परब याला मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. य़ावर आज सुमारे तीन-चार तास युक्तीवाद सुरु होता. हा युक्तीवाद पूर्ण झालेला नसल्याने उद्या पुन्हा युक्तीवाद होणार आहे.
नितेश राणेंच्या वकिलांनी ही माहिती दिली. वकिलांनी पोलिसांचा तपास आदी कागदपत्रे न्यायालयात सादर केली. परब यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला, तो आम्ही ऐकला. त्यांनी मांडलेल्या मुद्द्याला उत्तर देत आहोत. तो युक्तीवाद आज पूर्ण झाला नाही, उद्या यावर पुन्हा युक्तीवाद होईल असे सांगितले. तसेच फिर्यादीच्या वकिलांची अंतरिम जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळली असल्याचे ते म्हणाले.
गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का, यावर परब यांच्या वकिलांनी बोलायला हवे होते. परंतू ते न्यायालयात विधानसभेत काय झाले, कोणी कोणाचा सत्कार केला आदी सांगत होते. राजकारणाशी आमचा संबंध नाही, त्यांच्या भेटीगाठी सुरुच असतात. त्यामुळे आम्ही गुन्ह्याशी संबंधीत बोलू, असे त्यांनी सांगितले. उद्या दुपारी पावणे तीन वाजता सुनावणी सुरु होणार आहे.
संतोष परब यांचे वकील म्हणाले, संगनमताचा विषय हा तपासावेळी समोर आला. त्यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. अपघाताचा विषय असता तर वेगळी गोष्ट होती. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परब यांच्यावर पुन्हा जिवघेणा हल्ला होऊ शकतो, त्याच्या कुटुंबावर होऊ शकतो, तरी देखील परब आज न्यायालयात हजर राहिले, त्यांची मानसिकता विचारात घ्यायला हवी, असे विकास पाटील शिरगावकर, सातारा यांनी सांगितले.
केंद्रातील मंत्र्यांनी आमचे केंद्रात सरकार आहे, ही धमकीची भाषा का मानली जाऊ नये, असा मुद्दा न्यायालयात मांडल्याचे शिरगावकर म्हणाले.