"५० लाख द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द संपवून टाकू", अश्लील फोटो पाठवून माजी मंत्र्याकडे मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:35 AM2023-11-22T11:35:19+5:302023-11-22T11:41:52+5:30
यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOU मध्ये तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांत इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर सायबर गुन्हेगारांनी जाळे पसरले असून अज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिक या जाळ्यामध्ये अडकत आहेत. त्यात सेक्सटॉर्शन, आक्षेपार्ह मजकूर, अश्लीलता, मॉर्फिंग याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याद्वारे खंडणी मागितल्याचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, अशाच काहीसा प्रकार बिहारच्या माजी मंत्र्यासोबत घडला आहे. यासंदर्भात त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOU मध्ये तक्रार दाखल केली आहे.
पटना येथील कदमकुआं भागात राहणारे बिहार सरकारचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते वृषिन पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. यामध्ये म्हटले आहे की, दोन मुलींनी त्यांना त्यांच्या घरी बोलावले आणि त्यांचे कपडे काढण्यास सुरुवात केली. यानंतर व्हॉट्सअॅपवर एडिट केलेले अश्लील फोटो पाठवून ५० लाखांची मागणी केली आहे.
तसेच, जर पैसे दिले नाहीत तर ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून राजकीय कारकीर्द संपवून टाकू, असे फोनद्वारे वृषिन पटेल यांना धमकी देण्यात आली आहे. यानंतर वृषिन पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेत पोहोचले आणि ५० लाख रुपयांची मागणी आणि अश्लील फोटो पाठवून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
वृषिन पटेल यांनी आपल्या लेखी तक्रारीत सांगितले की, जवळपास दोन महिन्यांपूर्वी कदमकुआं पोलिस स्टेशन परिसरात एक महिला मला भेटायला आली होती. तिने माझ्या कर्मचार्यांना सांगितले की, मला मंत्र्याला भेटायचे आहे. सुरुवातील तिला नकार दिल्यानंतर सुद्धा तिने कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी भेटीची व्यवस्था केली. यानंतर महिलेने मला आमदार व्हायचे असल्याचे सांगितले. मी म्हणालो, ते इतके सोपे नाही. पक्ष कार्यालयात येऊन सभासदत्व घ्या, त्यानंतर लोकांमध्ये जाऊन काम करा.
या घटनेनंतर एके दिवशी कार्यालयाजवळून जात असताना मला ती महिला पुन्हा भेटली. त्यावेळी तिने सांगितले की, माझे घर जवळ आहे. थोड्यावेळासाठी तुम्ही घरी चला. तिच्या विनंतीवरून मी घरी पोहोचलो. तेथे मी तिचा नवरा कुठे आहे? असे विचारले असता महिलेने तो कामावर जात असल्याचे सांगितले. यावेळी दोन मुलीही तेथे उपस्थित होत्या. महिला काही घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यावर दोन्ही मुलींनी कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी त्याना ओरडलो आणि तिथून बाहेर पडलो, असे वृषिन पटेल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.