मनी लाँड्रिंग प्रकरण: सुकेश चंद्रशेखरनं नोरा फतेहीला गिफ्ट केली होती आलिशान कार, Photo आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:50 PM2021-10-23T17:50:23+5:302021-10-23T17:52:10+5:30
तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.
नवी दिल्ली-
तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. सुकेश चंद्रशेखर यानं ईडीच्या चौकशीदरम्यान नोरा फतेही हिला १ कोटीहून अधिक किमतीची आलिशान कार गिफ्ट दिल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. यात नोराहनं कार गिफ्ट मिळाल्याबाबतचा उल्लेख केला होता. आता नोरा फतेही हिला गिफ्ट मिळालेल्या कारचा फोटो समोर आला आहे. नोरानं तिला गिफ्ट म्हणून मिळालेल्या कारसोबत एक फोटो टिपला होता. नोराचा बीएमडब्ल्यू कंपनीच्या एका आलीशान कारसोबतचा फोटो समोर आला असून फोटोत दिसणारी कार सुकेशनंच गिफ्ट दिलेली कार असल्याचं सांगितलं जात आहे.
नोरा फतेही हिला कार गिफ्ट दिल्याची कबुली खुद्द सुकेश चंद्रशेखरनं दिली होती. नोराला कोणती कार गिफ्ट केली होती असं चंद्रशेखर याला विचारण्यात आलं असता त्यानं तुम्ही हे नोरा हिलाच विचारा असं म्हटलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार सुकेश आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांनी नोरा फतेही हिला १ कोटीहून अधिक किंमत असलेली BMW कार गिफ्ट म्हणून दिली होती.
२०० कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरण
जवळपास २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांची पोलीस कोठडी आज संपुष्टात आली आहे. त्यांना दिल्ली हायकोर्टात आज हजर करण्यात आलं. याआधी १४ ऑक्टोबर रोजी ईडीनं या प्रकरणात नोरा फतेही हिचाही जबाब नोंदवला आहे. या जबाबत नोरानंही कार गिफ्ट मिळाल्याचा कबुलीनामा दिला आहे. यावेळी नोरा आणि सुकेश यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार नोरा फतेही हिला ही कार डिसेंबर २०२० मध्ये चेन्नईमधील एका इव्हेंट दरम्यान देण्यात आली होती.
नोरा चौकशीत काय म्हणाली?
सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेही हिनं १४ ऑक्टोबर रोजीच एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं होतं. यात तिनं कोणत्याही मनी लाँड्रिंग प्रकरणात कोणत्याही पद्धतीचा सहभाग नसल्याचं म्हटलं होतं. आरोपीसोबत कोणतंही वैयक्तिक नातं नसून त्याला ओळखतही नसल्याचं तिनं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं होतं.
अनेक स्टार्सना फसवण्याचा होता कट -
ईडीने या प्रकरणात या पूर्वीही जॅकलीनची चौकशी केली होती. आधी, जॅकलीनही या प्रकरणात सामील असावी, असे ईडीला वाटत होते. मात्र, नंतर ती स्वतःच या प्रकरणातील विक्टिम असल्याचे समोर आले. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमाने जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या आपल्या पहिल्या जबाबात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केली होत्या.