पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडने कारणे दाखवा नोटीस
By पूनम अपराज | Published: August 7, 2018 09:34 PM2018-08-07T21:34:23+5:302018-08-07T21:35:42+5:30
संदीप अवस्थी यांनी याबाबत कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.
मुंबई - भारत सरकारच्या पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडच्या मदतीने विविध ट्रेनिंग अॅकॅडमींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट लेटर हेडचा आणि त्यावरील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या स्वाक्षरीचा वापर करुन सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला आहे. वेळीच हे प्रकरण लक्षात आल्यानंतर शिपींग कार्पोरेशनमध्ये कार्यरत असलेल्या संदीप अवस्थी यांनी याबाबत कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तपाले यांनी दिली.
कांजूरमार्ग परिसरात राहणारे संदीप अवस्थी हे शिपींग काॅर्पोरेशनमध्ये नोकरी करतात. २० जुलैपासून भारत सरकारच्या पोर्ट परिवहन मंत्रालयातर्फे डेहरादुनच्या अॅकॅडमी ऑफ इंटरनॅशनल मेरिटाईम ट्रेनिंग या इन्स्टिट्यूटमध्ये चुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. भारत सरकारच्या पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या लेटर हेडद्वारे संबधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली करणे दाखवा नोटीस अॅकॅडमी ऑफ इंटरनॅशनल मेरिटाईम ट्रेनिंग, 646 पटेल नगर डेहरादुन यांना बजावण्यात आली होती. या घटनेनंतर शिपींग काॅर्पोरेशनमध्ये एकच खळबळ उडाली.
मात्र, बनावट लेटर हेडचा वापर करून ही नोटीस बजावण्यात आल्याचा प्रकार शिपींग कार्पोरेशनमध्ये कार्यरत असलेल्या संदीप अवस्थी यांच्या निदर्शनास आला. या बनावट लेटर हॅड आणि स्वाक्षरीचा वापर करून अनेकांना अशा प्रकारे खोट्या बदनामीकारक नोटीसा पाठवत भारत सरकार पोर्ट परिवहन मंत्रालयाची बदनामी करण्यात आल्याने संदीप अवस्थी यांनी ई-मेलद्वारे वेळीच खबरदारी घेऊन परिमंडळ -७ कडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार कांजूरमार्ग पोलिसांनी भा. दं. वि. कलम ४६५,४६९,४७१,५००,५०१ सह कलम ६६(क) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.