संजय पांडे यांना ईडीकडून नोटीस; नुकतेच मुंबई पोलीस आयुक्तपदावरून झाले निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:49 AM2022-07-04T07:49:16+5:302022-07-04T07:49:42+5:30
२०१० आणि २०१५ च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट दिले
मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस बजावली आहे. पांडे यांना मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पांडे हे दोन दिवसांपूर्वीच निवृत्त झाले असताना त्यांना ईडी चौकशीला तोंड द्यावे लागेल. पांडे यांनी २००१ मध्ये एक आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. त्यादरम्यान पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. संबंधित कंपनीत मुलगा आणि आईला त्यांनी संचालकपदी नेमले. २०१० आणि २०१५ च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट दिले., दरम्यान सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुन्ह्याच्या आधारे ईडीदेखील याप्रकरणी चौकशी करत आहे.
चित्रा रामकृष्ण आणि योगी प्रकरणाशी संबंध?
पांडे यांच्या या फर्मला २०१० ते २०१५ च्या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. याच काळात एनएसईमध्ये को-लोकेशन घोटाळा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एनएसई को-लोकेशन घोटाळ्यात निवडक ब्रोकरना फायदा करून देण्यात आला होता. सुरुवातीला सीबीआयने एनएसई घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीबीआयने याप्रकरणी गेल्या चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या तपासाच्या आधारे एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी ग्रूप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे, तर पांडे यांच्या फर्ममधील एकाची चौकशी केल्याची माहिती मिळते.