गर्लफ्रेंड भेटायला आला अन् कुख्यात गँगस्टर NCB च्या जाळ्यात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:16 PM2021-07-05T22:16:25+5:302021-07-05T22:23:14+5:30
Drugs Case : सोनू पठाण हा मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या पठाण गॅंगचा प्रमुख म्होरक्या आहे.
मुंबई : मुंबईतील कुख्यात गँगस्टर सोनू पठाणला अटक करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने पायधुनी येथूल मोहम्मद जमान हिदायतुल्लाह खान उर्फ सोनूला काल रात्री १ वाजताच्या सुमारास बेड्या ठोकल्या. गर्लफ्रेंडला भेटायला आला असताना सोनू एनसीबीच्या जाळ्यात अडकला. सोनू पठाण हा मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या पठाण गॅंगचा प्रमुख म्होरक्या आहे.
गँगस्टर सोनू पठाणच्या विरोधात १० गुन्हे दाखल आहेत. यापैकी ७ गुन्हे मुंबई पोलिसात तर ३ गुन्हे एनसीबीमध्ये दाखल आहेत. सोनू हा अनेक प्रकरणात फरार आरोपी होता. सोनू मध्यरात्री आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला येणार असल्याची गुप्त माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सापळा लावून सोनू पठाण याला जेरबंद केले.
NCB च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना चिंकू पठाण उर्फ परवेज खान याच्याशी संबंधित होता. त्यावेळी चिंकू पठाण याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सोनू पठाण याचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर काल मध्यरात्री १ वाजता पायधुनी येथून अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.एनसीबीने दाऊद इब्राहिमचा खास परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण आणि आरिफ भुजवाला यांना अटक केली होती. चिंकू पठाणच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने माहीम येथे छापा टाकला होता.