कारागृहातून पळालेल्या कुख्यात गुंडाला ठोकल्या बेड्या, २३ गुन्ह्यांत सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:05 PM2022-01-10T20:05:55+5:302022-01-10T20:06:36+5:30
Crime News : दीड वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला यश
नाशिक रोड : चोरी, जबरी चोरी, घरफोडीसारख्या एक दोन नव्हे, तर तब्बल २३ गुन्ह्यांत सक्रिय सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अजय वाघेला याला पोलिसांनी अटक करून मध्यवर्ती कारागृहात डांबले होते. २०२० साली वाघेला हा कारागृहातून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने वाघेरा याला अटक केली.
मध्यवर्ती कारागृहातून संशयित अजय वाघेला हा १६ मे २०२० साली फरार झाला होता. त्यानंतर शहर पोलीस व गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. मात्र, वाघेला वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याची खात्रीशीर माहिती पोलिसांच्या हाती येत नव्हती. गुन्हे शाखा युनिट-२ चे अंमलदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या माहितीनुसार वाघेला हा त्याच्या साथीदारांसोबत शहरात वाहनचोरी व घरफोडीसाठी येणार असल्याचे समजले. भालेराव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना याबाबत माहिती दिली. वाघ यांच्या आदेशान्वये उपनिरीक्षक रमेश घडवजे, पोपट कारवाळ, विजय लोंढे, अंमलदार गुलाब सोनार, प्रशांत वालझाडे आदींच्या पथकाने आम्रपाली झोपडपट्टी परिसरातील पुलालगत सापळा रचला. वाघेला हा दुचाकीने पुलाजवळ आला. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पथकातील कर्मचारी सुगन साबरे, शंकर काळे यांनी प्रसंगावधान दाखवून झडप घालत वाघेला याला पकडले. त्याच्या ताब्यातील दुचाकीदेखील उपनगर येथील शिखरेवाडी येथून त्याने त्याचा साथीदार करण वाघेला (रा.सिन्नरफाटा) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच गुन्ह्यांत वाघेला हवा होता
शहर पोलिसांना फरार वाघेला हा कारागृहातून पळून जाणे, घरफोडी, वाहनचोरी, अल्पवयीन मुलीच्या अपहरणासारख्या पाच गुन्ह्यांमध्ये हवा होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता दहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. यामध्ये घरफोडी, दुचाकी चोरीचे सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या काही गुन्ह्यांचाही समावेश आहे.
चार दुचाकी हस्तगत
पोलिसांनी वाघेला याच्या ताब्यातून चोरीच्या १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये सीडी डॉन (एम.एच.१५ बीएफ७५१८), पॅशन प्रो (एम.एच.१७ बीपी ९६६४) घोटी येथून, तर इंदिरानगरमधून चोरलेल्या एका दुचाकीचे सुटे भाग आणि उपनगरमधून चोरलेल्या अपाचे दुचाकीचा समावेश आहे.