नागपुरातील कुख्यात गुंड बंटी ठवरे जेरबंद : दोन पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:47 AM2020-06-27T00:47:40+5:302020-06-27T00:48:47+5:30
शहरातील खतरनाक गुन्हेगार बंटी ऊर्फ राजू ठवरे याच्या आज पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ही सिनेस्टाईल कामगिरी बजावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील खतरनाक गुन्हेगार बंटी ऊर्फ राजू ठवरे याच्या आज पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ही सिनेस्टाईल कामगिरी बजावली.
कुख्यात गुन्हेगार बंटी ऊर्फ राजू ठवरे याच्याविरुद्ध खुनाच्या दोन गुन्ह्यांसह एकूण ५७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचे साथीदार आकाश गुंडलवार तसेच बदल सहारे या दोघांसह नंदा वानखेडे नामक महिलेच्या घरावर हल्ला केला होता. तिला पिस्तूल लावून येथे राहायचे असेल तर दरमहा ५ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यापासून बंटी फरार होता. तो मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पीएसआय नागोराव इंगळे यांना कळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना सांगितले. त्यावरून मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास प्रजापती चौकाकडे धाव घेतली. जंक्शन बारच्या बाजूला एक पडकी इमारत आहे. तेथे तो दडून असल्याची माहिती कळताच इमारतीला पोलिसांनी गराडा घातला. त्यानंतर बंटी दिसताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि मोबाईल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रभारी सहआयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय दिलीप चंदन, सहायक फौजदार नागोराव इंगळे, नायक प्रशांत कोडापे,नितीन अकोटे, सचिन तुमसरे आणि दीपक खाडे यांनी ही कामगिरी बजावली.
आणखी दोन पिस्तूल जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हसनबाग मधील कुख्यात गुंड शेख शाहरुख सय्यद अक्रम याला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपी शाहरूखविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून तो लकडगंजमधील ७५ लाखाच्या बहुचर्चित दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.
बल्लूही पिस्तूलासह सापडला
गुन्हे शाखेच्या चेन स्रॅचिंग पथकानेही कुख्यात गुंड समीर अली ऊर्फ बल्लू याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून इम्पोर्टेड वाटणारे एक पिस्तूल तसेच जिवंत काडतूस जप्त केले. पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कामगिरी बजावली.