कुख्यात गुंड विकास दुबेच्या साथीदारांना उत्तर प्रदेशात विमानाने नेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 03:53 AM2020-07-14T03:53:56+5:302020-07-14T03:54:21+5:30
सध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा १४०० किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती.
ठाणे : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फगुड्डन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांचा ट्रान्झिट रिमांड ठाणे न्यायालयाने सोमवारी मंजूर केला. त्यानंतर या दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकाकडे देण्यात आला. या दोघांनाही मंगळवारी मुंबईहून कानपूर येथे विमानाने घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा १४०० किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर त्याचे काही साथीदार फरार झाले होते. ठाण्याच्या कोलशेत भागातून मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्यापैकीच अरविंद आणि सुशील या दोघांना अटक केली. या दोघांनाही १२ जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायाधीश रश्मी झा यांनी त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांची रवानगी तळोजा (नवी मुंबई) कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, या दोघा आरोपींचा ताबा मिळविण्यासाठी कानपूर (उत्तर प्रदेश) पोलिसांच्या एका निरीक्षकासह तिघांचे पथक सोमवारी ठाण्यात पोहोचले. या पथकाने या दोघांच्याही ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. या वेळी आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी दोघांचा ताबा यूपी पोलिसांना देण्यात येऊ नये; तसेच अरविंद हा फक्त संशयित असल्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता करावी, अशी मागणी केली. या दोन्ही मागण्या फेटाळून लावत ठाणे सत्र न्यायालयाने कानपूर पोलिसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. दोघा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावे; तसेच त्यांचा चौकशी अहवाल ठाणे न्यायालयात सादर करावा, असे निर्देशदेखील या वेळी न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना दिले.