कुख्यात वीरू कोल्हेला कल्याणमध्ये अटक; दोन वर्षांपासून होता फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:58 PM2021-02-06T18:58:43+5:302021-02-06T19:06:55+5:30
लोहारा पोलिसांची कारवाई
यवतमाळ : वाघापूर येथील चाैकात डिसेंबर २०१९ मध्ये मोबाईलच्या किरकोळ वादातून विनय राठोड या युवकाचा सायंकाळी खून झाला होता. यातील मुख्य आरोपी वीरेंद्र उर्फ वीरू अशोक कोल्हे हा तेव्हापासून फरार होता. वीरू कोल्हेला लोहारा पोलिसांनी कल्याणमध्ये शिताफीने अटक केली.
वीरू कोल्हे याच्यावर खुनाचे तीन गुन्हे दाखल आहे. तो कुठलाही गुन्हा केल्यानंतर सहजासहजी पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यात त्याचा हातखंडा आहे. २०१९ पासून वाँटेड असलेल्या वीरूचा कुणालाच थांगपत्ता लागला नव्हता. लोहारा ठाणेदार म्हणून सहायक पोलीस निरीक्षक मीलन कोयल यांनी पदभार घेतला. तेव्हाच वीरू कोल्हेच्या अटकेचे प्रयत्न त्यांनी सुरू केले.
दीर्घकाळ मुंबईत सेवा दिलेल्या कोयल यांनी आपले जुने नेटवर्क वापरून वीरू कोल्हेचा माग काढला. त्याला कल्याण पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. लोहारा पोलिसांचे पथक वीरूला ताब्यात घेण्यासाठी कल्याणला पोहोचले आहे. वीरू कोल्हे याच्यावर २०१४ मध्ये शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये अवधुतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर २०१९ मध्ये लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला होता. गंभीर गुन्हे शिरावर असून गँगस्टर म्हणून तो पोलीस दप्तरी वाँटेड होता.
वडापावच्या गाडीवर करायचा काम
खुनाच्या घटनेनंतर पसार झालेला वीरू हा कल्याण परिसरात वडापावच्या गाडीवर काम करायचा. त्याने तेथील एका मिलमध्येही रात्रपाळीचे काम मिळविले होते. तो पोलिसांना चकमा देऊन ओळख लपवून याठिकाणी राहात होता. ठाणेदार मीलन कोयल यांनी त्यांचे मुंबईतील स्थानिक नेटवर्क वापरून वीरू कोल्हेचा शोध घेतला. खबऱ्यांकडून पुरेपूर माहिती मिळाल्यानंतरच कल्याण पोलिसांच्या माध्यमातून त्याला अटक केली.