रवी पुजारीनंतर आता दाऊदची गॅंग तपास यंत्रणांच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 06:18 PM2019-02-13T18:18:48+5:302019-02-13T18:56:31+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्यांना पकडण्यासाठी अद्याप मुंबई पोलिसांना यश मिळत नाही आहे.
मुंबई - कुख्यात गुंड रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे १ फेब्रुवारीला अटक करण्यात आले आहे. तसेच त्याला भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण टोळी परदेशात सक्रिय आहे. डी कंपनीसोबत इतरही अंडरवर्ल्ड डॉन वेगवेगळ्या विविध देशात वास्तव करत आहेत आणि तेथूनच मुंबईतला कारभार हाताळतात. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्यांना पकडण्यासाठी अद्याप मुंबई पोलिसांना यश मिळत नाही आहे.
विविध देशात लपून असणाऱ्या आणि वेश बदलेल्या अंडरवर्ल्ड गुंडांच्या यादीत गुरू साटमचा देखील समावेश आहे. गेल्याच महिन्यात पोलिसांनी त्याचा खास माणूस कृष्णकुमार नायरला अटक केली होती. गुरू साटम हा पूर्वी छोटा राजन टोळीसोबत कार्यरत होता. आता मुंबई पोलिसांच्या रडारवर प्रसाद पुजारी हा आहे. प्रसाद पुजारी हा परदेशात राहून आपला कारोभार चालवणारा आणि गुरू साटमहून अधिक सक्रिय असल्याची माहिती अंडरवर्ल्डविषयी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यापूर्वी प्रसाद पुजारी हा कुमार पिल्लेसाठी काम करत होता. अगोदर त्याने बंटी पांडे आणि रवी पुजारीसाठी काम केले होते. प्रसाद पुजारी हा विक्रोळीचा राहणार असून आता तो परदेशातून अंडरवर्ल्डचा कारोभार सांभाळतो. त्याचप्रमाणे त्याने स्वत:ची स्वतंत्र गॅंग तयार केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात असलेला विजय तांबट हा देखील पोलिसांच्या निशाण्यावर आहे. तांबटचे मूळ नाव विजय साळवी असे आहे. विशेष म्हणदे तांबट सिंगापूरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एजाज लाकडावाला हा देखील मुंबई पोलिसांच्या निशाण्यावर आहे.याआधी डी-कंपनी आणि सुरेश पुजारी याच्या धमकीच्या फोनच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
सप्टेंबर २००० साली बँकॉक शूट आउटनंतर छोटा राजनला हॉस्पिटलमधून पळून जाण्यात भरत नेपाळी आणि संतोष शेट्टी यांनी मदत केली होती. नंतर नेपाळी आणि संतोष शेट्टी विभक्त झाले. विजय शेट्टी हा मुंबई पोलिसांना पाहिजे होता. विजय शेट्टी बँकॉकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुख्य म्हणजे विजय शेट्टीनेच भरत नेपाळीचा खून केला होता. इंडोनेशियात असताना अबू सावंत यांने छोटा राजनला सहकार्य केले. परदेशातील छोटा राजनच्या अनेक हॉटेल्सचा कारभार सावंतच चालवतो.