आता स्पीड पोस्टमधून कागदपत्रांच्या आड ड्रॅग तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 08:14 PM2018-07-20T20:14:42+5:302018-07-20T20:15:18+5:30
महसूल गुप्तचर संचानलायाकडून (डीआरआय )कारवाई
मुंबई - मुंबई आणि कोलकाता येथून स्पीड पोस्टच्या माध्यमातून अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थाच्या तस्करीचे हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू होते. या प्रकरणी मुंबईच्या महसूल गुप्तचर संचानलायाकडून (डीआरआय )कारवाई करण्यात आली असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
अब्दुल अजीज युसूफ, आमिर अब्दुल रजाक आणि सालेह अहमद मारेय या आरोपींना अटक करण्यात आली असून यांच्यातील अनुक्रमे दोन नागरिक इथोपिया आणि एकजण येमेनचा नागरिक आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबई आणि कोलकाता एकूण १३२ किलो काठा एड्युलीस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत ३ कोटी ४० लाख असून यामागे अमली पदार्थ तस्करांचे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबई, कोलकाता, जयपुर, दिल्ली आणि नेपाळ या ठिकाणी या अमली पदार्थांची निर्यात केली जात असल्याचे माहिती डीआरआयला सूत्रांकडून माहिती मिळाली होती. स्पीड पोस्टाने कागदपत्रे पाठवत असल्याचे नमूद करून कागदपत्रांच्या आड ठेवून लपवून अमली पदार्थांची तस्करी केली जात होती.