न्यूड व्हिडीओ कॉल, स्क्रिन रेकॉर्डिंग! ४३ लाख उकळणारा आरोपी जेरबंद
By कमलाकर कांबळे | Published: December 27, 2023 08:37 PM2023-12-27T20:37:30+5:302023-12-27T20:38:07+5:30
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, राजस्थान येथून आरोपीला अटक, नवी मुंबई सायबर पोलिसांची कारवाई
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन अनेकांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला नवी मुंबई सायबर पोलिसांनी राजस्थान येथून जेरबंद केले आहे. हलीम फरीद खान (१९) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एका फिर्यादीला अशाच प्रकारे धमकावून त्याच्याकडून ४३ लाख २२ हजार ९०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या फिर्यादीच्या तक्रारीवरून नवी मुंबई सायबर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.
आरोपी हलीम खान याने फिर्यादीला व्हॉटसॲपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. फिर्यादीला न्यूड व्हिडीओ कॉल करून त्या कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांच्या माध्यमातून ४३ लाख २२ हजार ९०० रुपये उकळले. या प्रकाराने त्रस्त झालेल्या फिर्यादीने अखेर सायबर पोलिसांकडे याविषयी तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. फिर्यादीने ज्या बँक खात्यात रक्कम पाठविली होती. त्या बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख आणि ठिकाण निश्चित केले. त्यानंतर सापळा रचून आरोपीला राजस्थानच्या उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम गावातून त्याला अटक केली. दरम्यान आरोपीकडून अनेक मोबाइल, विविध कंपन्यांचे सीमकार्ड, विविध बँकांचे एटीएम कार्ड जप्त केले आहेत.
राज्यातील १३ जणांंना गंडवले
अटक केलेल्या या आरोपीने महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळपास १३ जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपीने फिर्यादीकडून उकळलेले ४ लाख १२ हजार १७५ रुपये संबधित बँक खात्यातून गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहुल तसेच सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले.