कोरोना वर्षात राज्यातील लाचखोरांची संख्या घटली, सात वर्षांतील सर्वांत कमी प्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 07:09 AM2021-02-06T07:09:31+5:302021-02-06T07:10:44+5:30
Bribe News : . गत वर्षभरात लाचखोरांची संख्या मात्र कमालीची घटली. वर्षभरात राज्यात ६३० सापळ्यांमध्ये ८६२ लाचखोर जाळ्यात अडकले. गत सात वर्षांतील लाचखोरीचा हा सर्वांत कमी आकडा आहे.
- ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : लॉकडाऊनचा परिणाम म्हणा की, कोरोना महामारीची भीती. गत वर्षभरात लाचखोरांची संख्या मात्र कमालीची घटली. वर्षभरात राज्यात ६३० सापळ्यांमध्ये ८६२ लाचखोर जाळ्यात अडकले. गत सात वर्षांतील लाचखोरीचा हा सर्वांत कमी आकडा आहे.
नवीन वर्षात महिनाभरातच ७० सापळे
कोरोना संकट हळूहळू कमी होत असताना लाचखोरांची संख्याही वाढत असल्याचे दिसत आहे. १ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात लाचेची ७० प्रकरणे पुढे आली आहेत. त्यात ९७ लाचखोरांना जेरबंद करण्यात आले. सर्वाधिक लाचेची प्रकरणे या महिन्याभरात पुणे परिक्षेत्रात पुढे आली. तेथे १८ सापळ्यांत २४ लाचखोरांना जेरबंद करण्यात आले. तर सर्वांत कमी सापळे मुंबई परिक्षेत्रात पुढे आली असून, येथे दोन सापळ्यांत तीन लाचखोर जाळ्यात अडकले. ठाणे परिक्षेत्रात पाच सापळ्यांत सहा जण, नाशिक परिक्षेत्रात १३ सापळ्यांत १६, नागपूर परिक्षेत्रात ९ सापळ्यांत १२, अमरावती परिक्षेत्रात आठ सापळ्यांत १२, औरंगाबादमध्ये ११ सापळ्यांत १७ आणि नांदेडमध्ये चार सापळ्यांत सात लाचखोर जेरबंद झाले.