Parambir Singh: ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंहच; वाझेंच्या कोडचा हॉटेल मालकाकडून उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:45 AM2021-08-23T08:45:33+5:302021-08-23T08:45:52+5:30
Sachin Vaze, Parambir Singh: हॉटेल, बीएमसी कंत्राटदारांबरोबर सेंटिग झाल्यानंतर तुला एक नंबरकडे घेऊन जातो. पेंडिंग प्रकरणे संपवून टाकू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र या कामातून त्याने हात झटकून घेतले असल्याचा दावा केला आहे.
- जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बडतर्फ एपीआय सचिन वाझेने ‘सीआययू’मध्ये कार्यरत असताना हॉटेल-बार चालकांकडून वसुलीवेळी ‘नंबर वन’च्या केलेल्या उल्लेखाबाबत संभ्रम निर्माण केला जात होता. मात्र आता ती व्यक्ती तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच असल्याबद्दल पुष्टी मिळत आहे. नंबर वन म्हणजे सीपी परमबीर साहेबच, असे वाझेने आपल्याला स्पष्ट करून सांगितले होते, असा दावा तक्रारदार हॉटल मालक बिमल अग्रवाल याने पोलिसांकडे केला आहे. त्याला आधारादाखल वाझेसोबतच्या संभाषण व बैठकीतील रेकॉर्डिंगच्या क्लिप सादर केल्या आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संबोधून ‘नंबर वन’ उल्लेख करण्यात आला असल्याचे परमबीर व वाझेकडून सांगितले जात असल्याचे तपास यंत्रणा व विरोधकांकडून वारंवार सांगितले जात होते, मात्र अग्रवालच्या जबाबातून त्याला आता मोठा छेद मिळाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सचिन वाझे हा हॉटेलचालक, बुकी व बीएमसी कॉन्ट्रॅक्टरर्सकडून हप्ता वसुली करण्यासाठी अग्रवाल याच्या मागे लागला होता. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत त्याच्या भेटीगाठी आणि व्हाॅट्असप कॉलवरून वारंवार संपर्कात होता. वाझे त्याला सीआययू, युनिट -११च्या कार्यालयात बोलवत असे. तर काहीवेळा अग्रवालच्या मर्सिडीजमध्ये बसून चर्चा करीत असत. ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्याने यूनिट ११मध्ये बोलावून घेतले होते. त्यावेळी वाझेने त्याला सांगितले की एक नंबरची कोरोनामुळे ६ महिने कमाई झालेली नाही, त्यामुळे त्यानी २ कोटींची वसुली करण्यास सांगितले आहे. त्यावेळी अग्रवालने खात्री करून घेण्यासाठी एक नंबर म्हणजे कोण? असे विचारल्यावर वाझेने सीपी परमबीर सिंह, असे स्पष्ट सांगिल्याचा दावा त्याने केला आहे.
हॉटेल, बीएमसी कंत्राटदारांबरोबर सेंटिग झाल्यानंतर तुला एक नंबरकडे घेऊन जातो. पेंडिंग प्रकरणे संपवून टाकू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र या कामातून त्याने हात झटकून घेतले असल्याचा दावा केला आहे. जबाबात जे सांगितले आहे त्याच्या पुष्ट्यर्थ जवळपास ७० क्लिप्स अधिकाऱ्यांकडे दिल्या आहेत.
बुकीबरोबर सेटलमेंट न झाल्याने टाकला छापा
nक्रिकेट बुकीकडून वसुली करण्यासाठी अग्रवालने महेश भाई व मन्नन नायक यांची वाझेशी भेट घालून दिली होती. मात्र त्याच्याकडून सेटलमेंट होऊ न शकल्याने ८ सप्टेंबर २०२० ला धवल जैन नावाच्या बुकीवर छापा टाकला.
nत्या गुन्ह्यात अन्य बुकींना फरारी आरोपी दाखवून त्यांच्याकडून मोठी वसुली केली. ज्यांनी काही दिले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. नायक याच्याकडे वाझेने २ कोटीची मागणी केली होती.