सुन्न करणारी घटना; प्रियकराने पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रेयसीची मृत्यूशी झुंज संपली
By पूनम अपराज | Published: February 9, 2021 09:54 PM2021-02-09T21:54:11+5:302021-02-09T21:55:52+5:30
Crime News : मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. विजय खांबे असं मृत तरुणाचं नाव आहे.
मुंबईत एक विचित्र घटना घडली आहे. प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीला पेटवून दिलं आणि पेटत्या प्रेयसीने त्याच अवस्थेत प्रियकराला मिठी मारली. यानंतर ९० टक्के भाजलेल्या प्रियकराचा मृत्यू झाला. तर जे . जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रेयसीनेही प्राण सोडले. ही सुन्न करणारी घटना जोगेश्वरी परिसरात घडली आहे.
मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. विजय खांबे असं मृत तरुणाचं नाव आहे. विजयचे आपल्या मेव्हण्याच्या धाकड्या बहिणीशी गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विजयला त्याच मुलीशी लग्न करायचं होतं. यासाठी त्याने लग्नाचा प्रस्ताव सुद्धा मुलीच्या कुटुंबीयांना पाठवला होता. पण त्याचा हा प्रस्ताव मुलीच्या आई-वडिलांनी फेटाळून लावला. नंतर विजयला दारू पिण्याचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे काही दिवसांनी या मुलीनेही विजयशी लग्न करण्यास नकार दिला होता. तरीही विजय मुलीला लग्न करण्यास जबरदस्ती करत होता. तसंच तो तिला त्रास सुद्धा देत होता. विजयच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल. रुग्णालयात आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ती घरी आली होती. यानंतर विजय पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला आणि इथे जे घडलं त्याने सगळेच हादरले.
व्हेलेंटाईन डेच्या आधीच जिवंत जाळले; पेटत्या प्रेयसीने मारली मिठी, प्रियकराचा होरपळून मृत्यू
तिला भेटायला आलेल्या विजयने आपल्यासोबत पेट्रोलची बाटली आणली होती. मुलगी घरी एकटीच असल्यामुळे विजयने संधी साधून घरात प्रवेश केला. विजय आणि मुलीमध्ये यादरम्यान पुन्हा वादंग निर्माण झाला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेली पेट्रोलची बाटली तिच्या अंगावर ओतली आणि तिला पेटवून दिलं. मुलीने आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र विजय दारात उभा राहून केवळ बघत होता. काही वेळानंतर मुलीने पळत जात विजयला मिठी मारली. विजयने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पेटत्या मुलेने त्याला काही सोडलं नाही. दोघंही पेटलेल्या अवस्थेत घराच्याबाहेर आले आणि खाली कोसळले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन आग विझवली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केलं. आगीत विजय ९० टक्के भाजला होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान जे जे रुग्णालयात मुलीने सुद्धा आपले प्राण सोडले. व्हेलेंटाईन विकमध्येच ही सुन्न करणारी घटना समोर आल्यामुळे मुंबईत खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होते आहे.