नर्स आहे की वैरीण! ८ मुलांचा जीव घेऊन १० चिमुरड्यांच्या हत्येचा केला प्रयत्न
By पूनम अपराज | Updated: November 12, 2020 17:32 IST2020-11-12T17:32:10+5:302020-11-12T17:32:45+5:30
Murder : याप्रकरणी चेशाइर पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्यांचा कट रचणे या कलमांतर्गत नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नर्स आहे की वैरीण! ८ मुलांचा जीव घेऊन १० चिमुरड्यांच्या हत्येचा केला प्रयत्न
लंडन - सध्या जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होत असताना कोरोनायोद्धा म्हणून नावाजल्या जाणाऱ्या डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी नर्स. मात्र, नर्स पेशाला युके हॉस्पिटलमध्ये काळिमा फासणारी घटना घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये जून २०१५ ते २०१६ दरम्यान एका नर्सने चक्क ८ मुलांचा जीव घेतला तर १० मुलांच्या हत्येचा कट रचत होती. याप्रकरणी चेशाइर पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्यांचा कट रचणे या कलमांतर्गत नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिव्हरपूलच्या दक्षिणेकडील काऊन्टर ऑफ चेस्टर हॉस्पिटलच्या नवजात बालकांच्या युनिटमध्ये झालेल्या मृत्यूच्या तपासणीनंतर 30 वर्षीय नर्स ल्युसी लेबीवर आरोप लावण्यात आले असल्याचे चेशाइर पोलिसांनी सांगितले. मे २०१७ मध्ये पोलिसांनी अनेक बाळांच्या मृत्यूचा तपास सुरू केला. लेबी हिला मंगळवारी तिसऱ्यांदा अटक करण्यात आली. यापूर्वी तिला 2018 आणि 2019 मध्ये अटक करण्यात आली होती आणि प्रत्येक वेळी पुढील चौकशी प्रलंबित ठेवली. यूकेच्या चेस्टर हॉस्पिटलमध्ये २०१५ आणि २०१६ सालादरम्यान अनेक मुलांचा संशयास्पद मृत्यू होत होता. हृदय किंवा फुफ्फसं निकामी झाल्यामुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचं निदान होत होतं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या मुलांच्या हाता-पायावर वेगळ्याच प्रकारच्या छोट्याच्या जखमा सापडत होत्या.
ल्यूसीने या आधी लिव्हरपूल वूमेन्स हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिने चेस्टर हॉस्पिटलमध्ये नोकरी पत्करली. २०१३ साली तिच्या युनिटमधील २ मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये ती संख्या ८ वर गेली होती. त्यानंतर पुन्हा ५ मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे ल्यूसीबद्दल पोलिसांचा संशय अधिकच वाढला. पोलीस याचा अधिक तपास सध्या करत आहेत.