आमदार भांगडियांबाबत अश्लील शिवीगाळ; रुग्णालयाच्या एमडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:39 PM2021-05-10T20:39:26+5:302021-05-10T20:40:11+5:30
The MD of the hospital was handcuffed by the police : जिल्हाधिकारी यांनी चिमूर येथील हिलींग टच मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलला कोविड हेल्थ केअर सेंटरची मान्यता अटी, शर्तीच्या आधारे दिली होती. मात्र, हॉस्पिटलने अटी, शर्ती पूर्ण न करता कोविड रुग्ण भरती करणे सुरू केले होते.
चिमूर(चंद्रपूर) : येथील हिलिंग टच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कोविड केअर हेल्थ सेंटरची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली. यामागे आमदार बंटी भांगडिया यांचा हात असल्याचा समज करून हॉस्पिटलच्या एमडीने आमदार बंटी भांगडिया यांच्याविरोधात त्यांच्या फेसबुक, व्हाॅट्स ॲप व भ्रमणध्वनीवर अश्लील शिवीगाळ व समाजात तेढ निर्माण करणारे शब्दप्रयोग करून समाजमाध्यमावर वायरल केले, अशा आशयाच्या आमदार भांगडिया यांनी केलेल्या तक्रारीवरून हॉस्पिटलचे एमडी साईनाथ ऊर्फ अश्वमेघ बुटके (४३, रा. टिळक वार्ड, चिमूर) यांना चिमूर पोलिसांनी सोमवारी अटक केली.
जिल्हाधिकारी यांनी चिमूर येथील हिलींग टच मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलला कोविड हेल्थ केअर सेंटरची मान्यता अटी, शर्तीच्या आधारे दिली होती. मात्र, हॉस्पिटलने अटी, शर्ती पूर्ण न करता कोविड रुग्ण भरती करणे सुरू केले होते. रुग्णाचे बिल अव्वाच्या सव्वा घेणे सुरू केले होते. याची तक्रार सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कडे केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवून हिलिंग टच हॉस्पिटलची मान्यता ६ मे रोजी रद्द केली. हे सर्व आमदार भांगडिया यांच्यामुळे झाले असल्याचे समजून हॉस्पिटलचे एमडी साईनाथ ऊर्फ अश्वमेघ बुटके यांनी समाजमाध्यम व आमदार भांगडिया यांच्या फेसबुक व्हाॅट्स ॲपवर अश्लील शिवीगाळ, बदनामीकारक मजकूर तसेच जातीय तेढ निर्माण होईल असा शब्दप्रयोग करून सार्वजनिक केला तसेच आमदारांच्या मोबाईलवर अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे आमदार भांगडिया यांनी याबाबतची तक्रार चिमूर पोलिसांत केली. पोलिसांनी साईनाथ ऊर्फ अश्वमेघ बुटकेविरुद्ध भादंवि कलम ५००, ५०१, ५०४, ५०५ (२), ५०७ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.