कोर्टात सुरू होती ऑनलाइन सुनावणी, अचानक चालू झाला अश्लील व्हिडीओ अन् त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:04 PM2023-12-13T16:04:33+5:302023-12-13T16:05:58+5:30
व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान लॉग इन करून दाखवला आक्षेपार्ह व्हिडिओ
obscene video in online hearing of Court: न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडीओ चालवल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही काळात समोर आली आहेत. अवघ्या आठवडाभरापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अश्लील व्हिडिओ दाखविण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच राज्यात अशी घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयानंतर आणखी एका न्यायालयीन कामकाजा दरम्यान एक अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला. कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (KSAT) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणी दरम्यान एक अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला. ऑनलाइन सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडीओ दाखविण्यात आल्याने न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले. परिणामी न्यायालयाचे ऑनलाइन कामकाज घाईघाईने थांबवावे लागले. त्यानंतर न्यायालयाने एक कठोर निर्णय घेतला.
या प्रकरणी KSAT अधिकाऱ्याने बेंगळुरूमधील सेंट्रल सेन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान लॉग इन करून आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी ऑनलाइन सुनावणी रद्द केली. या प्रकरणी आयटी कायद्याच्या कलम 67, 67 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू आहे.
आठवड्याभरापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान एक अश्लील चित्रपट दाखवण्यात आला होता. संगणक विभागाच्या निबंधक कार्यालयातील एन. सुरेशने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. न्यायालयीन कामकाजात व्यत्यय येण्याची पार्श्वभूमी आय.टी. विभागाने तपासली आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी कलम 67, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर येताच कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरू, धारवाड आणि कलबुर्गी खंडपीठांमधील न्यायालयांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घातली आहे.