तब्बल 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 06:34 PM2021-12-18T18:34:57+5:302021-12-18T18:35:22+5:30
Odisha : पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
नवी दिल्ली : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील उच्च न्यायालयाने एका हत्येच्या प्रकरणात 19 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने 3 खून खटल्यातून हबिल सिंधू नावाच्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हबिल सिंधूला सन्मानपूर्वक सोडण्याचे आदेश देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, हबिल सिंधूने जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयाचा सहारा घेतला होता.
त्यानंतर उच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकिलांकडून (एमिकस क्युरी) पुन्हा तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सरकारी वकिलांनी सिंधूविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील 32 पानी कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली आणि त्याचा अहवाल उच्च न्यायालयात दिला. ज्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा त्याचे वय जवळपास 40 वर्षे होते. 19 वर्षांनंतर हबिल सिंधूला उच्च न्यायालयासमोर कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने तिला निर्दोष घोषित करण्यात आले. निर्दोष सिद्ध झाल्यानंतर हबिल सिंधू खूपच आंनदी दिसून आला. द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हबिल सिंधूने सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे मी खूप खूश आहे. जवळपास 19 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. हा काळ खूप कठीण होता. आता गावी जाऊन शेती करणार आहे.