औरंगाबादेत अश्लील लिंक पाठविणाऱ्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 03:30 PM2018-07-13T15:30:49+5:302018-07-13T15:31:48+5:30
गल्लीतील महिलेला अश्लील लिंकचा संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद : गल्लीतील महिलेला अश्लील लिंकचा संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रकार २२ फेब्रुवारी रोजी घडल्यानंतर पीडिता तक्रारीसाठी पुढे आली नव्हती.
बाबासाहेब रंगनाथराव आळंजकर (रा. बेगमपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता आणि आरोपी एकाच वसाहतीत राहातात. त्यामुळे परस्परांचे मोबाईल नंबर त्यांच्याकडे आहेत. २२ फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर अश्लील वेबसाईटची लिंक पाठविली. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने ती लिंक ओपन केल्यानंतर ती लिंक अश्लील असल्याचे दिसले. त्यानंतर पीडितेने आरोपीला फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. नंतर त्यांनी पुन्हा फोन केल्यानंतर आरोपीने फोन उचलला आणि तो म्हणाला की, तो मेसेज तुला आला का, तू ती लिंक पाहिली का? त्यानंतर तू ही लिंक पाठवून तुझी पत घालविल्याचे सांगून पीडितेने फोन कट केला.
या नंतर आरोपीने तिला फोन करून तो मेसेज चुकून तुला पाठविला गेला, तो मेसेज डिलिट करून टाकू असे सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडिता त्याचा नंबर ब्लॉक करीत असताना आरोपी आणि त्याची पत्नी पीडितेला भेटली आणि पुन्हा त्यांनी तो मेसेज चुकून तुम्हाला पाठविला गेल्याचे ते म्हणाले. मात्र याविषयी माफी न मागता ते खोटे बोलत असल्याचे पीडितेला खटकले होते. आरोपी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या दबावामुळे पीडितेने कालपर्यंत तक्रार नोंदविली नव्हती.
शिष्टमंडळ उपायुक्तांना भेटले
दरम्यान, गुरुवारी दुपारी महिलांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यांनी याविषयी तक्रार केली. त्यानंतर शिष्टमंडळ आणि पीडितेने बेगमपुरा ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षक राजश्री आडे तपास करीत आहेत.