विद्यार्थी फी च्या अपहारप्रकरणी शिक्षकावर गुन्हा; १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 01:56 PM2021-08-14T13:56:55+5:302021-08-14T13:59:32+5:30
Crime News : शैक्षणिक वर्ष २०१९ - २० ला जगदाळे १० वी क चे वर्गशिक्षक म्हणून कामकाज पाहात होते. या वर्गात सुमारे ६३ विद्यार्थी आहेत.
वडूज : वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील शालेय विद्यार्थ्यांच्या फी चा अपहार केल्याप्रकरणी उपशिक्षक आनंदा विठोबा जगदाळे रा. पेडगांव (हल्ली वडूज) यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, उपशिक्षक जगदाळे यांनी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या नैदानिक परीक्षा, सराव चाचण्या, प्रथम सत्र, पूर्व परीक्षा, सराव परीक्षा १ व २, जादा सराव परीक्षा (घरी), एन.टी.एस. सराव, विद्यार्थी दिन, दहावी निरोप समारंभ, गणेशोत्सव आदींसाठी विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष २०१९ - २० ला जगदाळे १० वी क चे वर्गशिक्षक म्हणून कामकाज पाहात होते. या वर्गात सुमारे ६३ विद्यार्थी आहेत. पैकी दोन विद्यार्थ्यांची फी माफ करुन इतर विद्यार्थ्यांची प्रत्येकी १ हजार प्रमाणे ६१ हजार फी गोळा केली होती. सदरची फी जगदाळे यांनी परीक्षा विभागप्रमुख घनवट मॅडम यांच्याकडे जमा न करता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. याबाबत मुख्याध्यापक जाधव यांनी फी जमा करण्यासंदर्भात कार्यालयात बोलावून विचारणा केली असता जगदाळे यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याबरोबर फी जमा करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
सदर घटनेचा हवालदार शांताराम ओंबासे अधिक तपास करत आहेत. दरम्यान विद्यार्थी फी च्या अपहारप्रकरणी अटक केलेल्या जगदाळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार दि.१७ पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.