एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान, शरजिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 11:23 PM2021-02-02T23:23:48+5:302021-02-03T07:10:41+5:30
Sharjeel Usmani News : एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे - नुकत्याच पुण्यात आयोजित झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अॅड. प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली होती. शरजिल उस्मानी याने एल्गार परिषदेत ''हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरिके से सड़ चुका है'' आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ''मी भारतीय संघराज्य मानत नाही'', अशी प्रक्षोभक विधाने केली होती. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला होता.
या प्रकरणी उस्मानी याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली होती. शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा अर्ज आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिला आहे. त्यांनी चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र आम्ही याचा पाठपुरावा करीत राहाणार असल्याचे अँड प्रदीप गावडे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना सांगितले होते.