सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: June 1, 2023 06:59 PM2023-06-01T18:59:09+5:302023-06-01T18:59:21+5:30
उल्हासनगरात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: गेल्या शनिवारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्या बाबत गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी शिवसेना शिंदे गट तर गुरवारी भाजपच्या वतीने आंदोलन केले. अखेर हिललाईन पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आपल्या विधानाचे विपर्यास केल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी पत्रकारा सोबत बोलताना दिली आहे.
उल्हासनगर राष्ट्रवादी पदाधिकारी शिबीर बैठकीचे आयोजन शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी गेल्या शनिवारी कॅम्प नं-५ येथे केले होते. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे यांनी पदाधिकारी बैठकीला मार्गदर्शन केले. मार्गदर्शन वेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक शेर चले, सौ सिंधी कुत्ते भुके अश्या वक्तव्य केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या वक्तव्यावर राष्ट्रवादी पक्षातील निष्ठावंत गटाचे व कलानी विरोधक भारत गंगोत्री यांच्या समर्थकांनी प्रथम आक्षेप घेतला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आव्हाड यांच्यावर सिंधी समाजबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करा. अशी मागणी करून बुधवारी आंदोलन करण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या आंदोलनानंतर भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरवारी आंदोलन करण्यात आले. पुरस्वानी यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी आव्हाड यांच्यावर सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर गुरवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच गुन्हा दाखल करण्याचे सत्र भाजप व शिंदे गट यांनी सुरू केल्याचे ते पत्रकारां सोबत बोलतांना म्हणाले.