अरे बापरे...सांताक्रूजच्या बंटी - बबलीने चक्क ७०० लोकांना लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 09:11 PM2018-07-25T21:11:34+5:302018-07-25T21:12:25+5:30
गुंतवणूकींच्या नावाखाली 700 जणांना कोट्यावधी रुपयांना गंडा
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूक करून जाडा परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेने ७०० गुंतवणूकदारांना चांगला जाडा परतावा देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या ठग जोडप्याला अटक केली आहे. रईसा पुनावाला(वय - ४३) व तिचा पती मुस्तफ्फा बेग(वय -४०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दांपत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपोझिटर्स(एमपीआयडी) कायद्याअंतर्गत अटक केली.
सांताक्रूझ परिसरात राहणारे पुनावाला आणि बेग या दांपत्यांनी २०१२ ते २०१७ या कालावधीत आरएस ट्रेडर्स नावाने कंपनी सुरू केली होती. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना शंभर दिवसांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे थोडेतोकडे नाही तर मुंबईसह मुंबई बाहेरच्या सातशे जणांनी कोट्यावधी रुपये कंपनीत गुंतवले. सुरवातीला आरोपींनी काहींना रक्कम दिली. त्यामुळे झालेल्या सुमारे सातशेहून अधिक जणांनी यामध्ये गुंतवणूक केली. रईसाच्या पहिल्या पतीने मोठ्या रकमेची गुंतवणूक विम्यामध्ये केली होती. त्यामुळे गुंतवणूक योजना बुडाली, तरी गुतवणूकीची रक्कम परत करू शकतो, असे गुंतवणूकदारांना आश्वासन दिले होते. त्यामुळे 50 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली. मात्र, शंभर दिवसांनंतर आरोपींनी कोणतीही रक्कम गुंतवणूकदारांना दिली नाही. त्यानंतर आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. अखेर याप्रकरणी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला. अखेर याप्रकरणी नुकतीच आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.