अंमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी ओला कॅबचालकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 08:10 PM2019-06-25T20:10:25+5:302019-06-25T20:13:32+5:30
कोंढव्यातील कात्रज - कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात एका ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केल्याचा प्रकार अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी झाला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती.
पुणे : कोंढव्यातील कात्रज - कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात एका ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केल्याचा प्रकार अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी झाला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती.
सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२,रा. लोहगाव) असे खून झालेल्या ओला चालकाचे नाव आहे.तपेशकुमार पुखराम चौधरी (वय ३२ राहणार -जोधपूर, राजस्थान) कॅब घेऊन पसार झालेल्या संशयितांचा पोलिसांनी माग काढल्यावर ते गाडीसह गुजरात येथे असल्याची माहिती उपलब्ध झाली़ होती. त्यानुसार गुजरात पोलिसांची मदत घेण्यात आले. त्यांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी सदर प्रकार केल्याचे सांगितले आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा कात्रज रोडवरील आईएमडी स्कुलसमोरील मैदानात सकाळी फिरायला आलेल्या लोकांना एक मृतदेह पडला असल्याचे आढळून आले़ होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा फोटो व्हायरल करून संबंधित व्यक्तीची ओळख पटवली. त्यात मृत शास्त्री हे ओला कॅब चालक असल्याचे समोर आले. त्यांच्या कंपनीच्या मदतीने बघितल्यावर गाडीचे लोकेशन गुजरात राज्यातील वापी दाखवत होते. त्यानुसार गाडीचा प्रवास लक्षात घेऊन अमिरगड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. दुसरीकडे पुणे पोलिसांचे पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले होते. तेथे गुजरात राजस्थान बॉर्डरवर आरोपीला पकडण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या तपासात आरोपीने हा गुन्हा कबूल केला. मयत शास्त्री यांच्याकडील स्वीफ्ट गाडीतून राजस्थानमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा त्याचा इरादा होता. त्याकरिता शःस्त्री यांचा खून केल्याचेही सांगितले. या आरोपीच्या विरोधात अजून गुन्हे दाखल आहेत का याचा शोध घेणे सुरु आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पंकज पवार , उपनिरीक्षक संतोष शिंदे, सागर काळे आदींनी तपास केला.