अजब चोरटे! घरात घुसले, वृद्ध दाम्पत्याला लुटले; निघताना पाया पडले, ५०० रुपये देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 05:20 PM2021-08-31T17:20:15+5:302021-08-31T17:20:42+5:30
वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेऊन ४ चोरट्यांनी लंपास केली रोकड; चार लाखांचे दागिनेदेखील लांबवले
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये चोरीची एक विचित्र घटना घडली आहे. एका वृद्ध दाम्पत्याला बांधून त्यांच्या घरात एका टोळीनं चोरी केली. राजनगरच्या सेक्टर-९ मध्ये हा प्रकार घडला. माजी महापौर आशू वर्मा यांच्या बंगल्याजवळ वास्तव्यास असलेल्या सुरेंद्र वर्मांच्या घरात चोरी झाली. घटना घडत असताना सुरेंद्र आणि त्यांची पत्नी अरुणा घरी होते. बुलंदशहर रोड परिसरात असलेल्या औद्योगिक क्षेत्रात सुरेंद्र यांचा कारखाना होता. मात्र तो त्यांनी बंद केला.
सुरेंद्र वर्मा यांना तीन मुली आहेत. तिघींचे विवाह झाले असून त्या परदेशात राहतात. सोमवारी रात्री साडे तीन वाजता चार चोर त्यांच्या घरात शिरले. त्यांनी चेहरे झाकलेले होते. गॅस कटरच्या मदतीनं लोखंडी दरवाजा कापून, त्यानंतर काचा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
मला न विचारता पाणीपुरी का आणली? दाम्पत्यामध्ये वाद; पत्नीची विष पिऊन आत्महत्या
एका चोरट्याच्या हाती बंदूक होती. तर इतर तिघांच्या हाती सुरे होते. चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवलं. दीड लाख रुपयांची रोकड आणि चार लाखांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पळ काढला. वर्मा यांनी या प्रकरणी कवीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिन्यांसह पळ काढताना वृद्ध दाम्पत्याची माफी मागितली. चोरट्यांनी दाम्पत्याचे पाय धरले. आम्हाला माफ करा. आम्ही ६ महिन्यांत तुमचे पैसे आणि दागिने परत देऊ, असं चोरट्यांनी घरातून बाहेर पडताना दाम्पत्याला सांगितलं. त्यांनी घरातून निघताना दाम्पत्याला ५०० रुपये दिले.