Old Currency Notes: बापरे! नोटाबंदीच्या ६ वर्षांनंतरही सापडल्या ६२ लाखांच्या जुन्या नोटा; दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:50 PM2022-07-07T16:50:15+5:302022-07-07T16:51:44+5:30
१४ लाख रूपयांच्या नव्या नोटांच्या बदल्यात डील झाल्याचा अंदाज
Old Currency Notes: नोटाबंदीला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. कित्येक लोकांना आता जुन्या नोटाही आठवणारही नाहीत. पण दिल्लीत मात्र ६२ लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह दोघांना पोलिसांनी पकडले. दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागातील हे प्रकरण आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दोन लोकांकडून जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची अनेक बंडलं सापडली. नोटांची नीट मोजणी केली असता एकूण ६२ लाख रुपयांच्या जुन्या नोटा असल्याचे आढळून आले. या दोघांनी १४ लाख रुपयांच्या नव्या नोटा देऊन या जुन्या नोटा खरेदी केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले.
#UPDATE | Two apprehended for possessing old currency notes of Rs 500 and Rs 1000 worth Rs 62 lakhs in Delhi's Laxmi Nagar area. They bought these old currency notes using new currency worth Rs 14 lakhs pic.twitter.com/ib8pThOnml
— ANI (@ANI) July 7, 2022
ताब्यात घेण्यात आलेले लोक जुन्या नोटांचे काय करायचे आणि इतक्या जुन्या नोटा कुठे व का ठेवायचे याबाबत आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. नोटाबंदीनंतर लोकांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून घेण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती. पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांचे पैसे बुडतील, पकडले जातील या भीतीने अनेक जण पैसे घेऊन बँकेत गेलेच नाहीत, असेही समजले. या प्रकरणातही काळ्या पैशाचाच अँगल आहे की काय, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या लोकांनी अनेक ठिकाणांहून जुन्या नोटा जमा केल्याचे समोर आले. सुमारे २० लाख रुपयांना या जुन्या नोटा दुसऱ्या कोणाला तरी विकणार असल्याचेही उघड झाले. ही बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली की, जुन्या नोटांचा अजूनही आडून-आडून वापर सुरू आहेत का? काही लोकांनी यावर मीम्सही शेअर केले. एका यूजरने लिहिले की, काही स्मार्ट लोक मोठा गेम खेळत आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 99.9 टक्के जुन्या नोटा बँकांमध्ये परत गेल्या असल्या तरी, उर्वरित 0.1 टक्के अजूनही बाजारात फिरत असल्याची बातमी शेअर करताना खिल्ली उडवली. या चलनी नोटा बदलून दिल्या जात होत्या का, या रॅकेटमध्ये सरकारमधील कोण-कोण सामील आहेत, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.