खळबळजनक! राहत्या घरात वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 07:29 PM2019-08-12T19:29:33+5:302019-08-12T19:32:15+5:30
बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय
नवी मुंबई - धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात वृध्देच्या हत्येची घटना सोमवारी सकाळी घणसोलीत घडली आहे. पहाटेच्या सुमारास पती कामानिमित्ताने घराबाहेर गेले असता हा प्रकार घडला आहे. मात्र,या घटनेनंतर त्याच इमारतीमध्ये राहणारा मृत महिलेचा मुलगा बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त होत आहे.
घणसोली येथील घरोंदा वसाहतीमधील सिध्दीविनायक सोसायटीच्या ए/13 क्रमांकाच्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथे राहणाऱ्या चंद्रकला भय्ये (6-क) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. पती यशवंत भय्ये यांच्यासह त्या तिथे रहायच्या. तर त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा शेखर हा पत्नी व लहान मुलासह रहायला आहे. सोमवारी सकाळी तो दुध आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. परंतु बराच वेळ होवूनही तो परत न आल्याने त्याची खालच्या मजल्यावरील सासू - सासऱ्यांच्या घरी आली. परंतु दरवाजा ठोकूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी सासरे यशवंत यांना फोन करुन कळवले. यानुसार ते काही वेळात घरी आले असता स्वत:कडील चावीने त्यांनी दरवाजा उघडला. यावेळी घरात हॉलमध्ये चंद्रकला ह्या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या असल्याचे आढळून आले. धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या चौकशीत मृत वृध्द महिला चंद्रकला यांचा मुलगा शेखर हा सकाळपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. यामुळे पोलीसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो स्वतच्या हातांकडे निरखून पाहत सोसायटीमधून बाहेर जाताना दिसून येत आहे. शिवाय त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याने संशय व्यक्त होत आहे. परंतु हत्येमागील कारण देखिल अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.