२५ कोटींनी भरलेली पेटी पाठवतोय; निवृत्त अधिकाऱ्याला मेसेज आला अन् पुढच्या १५ दिवसांत...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:02 AM2021-08-09T10:02:25+5:302021-08-09T10:02:51+5:30
एका नायजेरियन आराेपीसह दाेघे अटकेत
- सचिन राऊत
अकोला : एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फेसबुक फ्रेंडने २५ काेटी रुपयांचे गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवून अवघ्या १५ दिवसांत तब्बल ५६ लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एक नायजेरियन तरुण आणि बंगलाेर येथून एक अशा दाेन आराेपींना अटक केली.
लहरियानगर येथील आत्माराम रामभाऊ शिंदे यांनी फेसबुकवर अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर ठकबाजांनी त्यांच्याशी संभाषण सुरू केले. त्यापैकी एकाने सांगितले की, ताे अमेरिकेतील सैन्यात कार्यरत असून सध्या इस्रायल येथे आहे. २५ काेटी रुपयांची एक पेटी इस्रायल येथील सैनिकाकडे असल्याचे सांगत ही पेटी ताे अमेरिकेत घेऊन जाऊ शकत नाही, अशी बतावणी केली. ही पेटी भारतात पाठवून शिंदे यांना देण्याचे आमिष दिले. त्या माेबदल्यात विविध टॅक्स भरावे लागणार असल्याचे सांगितले. या आमिषाला बळी पडत शिंदे यांनी ५६ लाख रुपये विविध राज्यांतील बँक खात्यात पाठविले. ही रक्कम ठकबाजांनी काढून घेतली. फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली.
खदान पाेलिसांनी कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात नायजेरिया येथील रहिवासी हरिसन इंगाेला, रा. डेल्टा सिटी, नायजेरिया यास मुंबईतून अटक करण्यात आली तर दुसरा आराेपी बंगलाेर येथील रहिवासी नसिमुद्दीन यालाही बेड्या ठाेकल्या.
विदेश व परराज्यातील १० आराेपी
आरोपींमध्ये रॅपगस्ट सुजी, रिधी गुप्ता (रा. आनंदपूर, कोलकाता, पश्चिम बंगाल), आशिष कुमार (कॅनरा बँक, नवी दिल्ली), नसिमुद्दीन (रा. राजाजीनगर, बंगलोर), सिबानू कायपेंग (रा. पेरांबूर, केरळ), इम्रान हुसेन (रा. बंगलोर), सोबीनोय चकमा (रा. जमनानगर, गुजरात), रमलज्योती चकमा (रा. एमजी रोड, बंगलोर), अशोक (रा. दिल्ली), अँथनी (रा. सिरिया) या १० ठकबाजांचा समावेश आहे.
संभाषण मराठीत : शिंदे यांनी रक्कम देण्याचे कबूल करताच सावज जाळ्यात आल्याची खात्री पटल्यावर पुढचा सारा संवाद मराठीत झाला. शिंदे यांना दुसऱ्याच दिवशी पुणे येथून दुसऱ्या एका ठकबाजाने फाेन केला व मराठीत संभाषण केले.
३५ लाख वाचले
शिंदे यांना अंतिम टप्प्यात ३५ लाखाची मागणी करण्यात आली. दरम्यान, शिंदे यांचे मुंबईला गेलेले कुटुंबीय परतल्यानंतर त्यांनी आणखी ३५ लाख रुपये टाकताच २५ काेटी रुपयांची पेटी मिळणार असल्याचे सांगितले.
मात्र कुटुंबीयांनी त्यांना समजावताच फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि ३५ लाख वाचले.
कुटुंबीय गेले होते उपचारासाठी मुंबईत
आत्माराम शिंदे यांच्या पत्नीच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व मुलगी मुंबईला गेले हाेते. यादरम्यान शिंदे घरी एकटेच असताना त्यांना ठकबाजांनी जाळ्यात ओढले. कुटुंबीय परत आल्यानंतर त्यांची उर्वरित रक्कम वाचली.