नेरुळमध्ये मारहाण करून वृद्धांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:34 PM2020-09-14T23:34:08+5:302020-09-14T23:34:27+5:30
नेरुळ परिसरात वृद्धांना लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : मारहाण करून वृद्धांना लुटल्याच्या दोन घटना नेरुळमध्ये घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये वृद्धांच्या हातातील मोबाइल चोरीला गेले आहेत. मात्र, सलग घडलेल्या घटनांमुळे वृद्धांना लुटणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नेरुळ परिसरात वृद्धांना लुटण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री अरुण बलकवडे (५९) हे सेक्टर २१ येथील रस्त्याने चालले असता, मोटारसायकलवरून चाललेली एक व्यक्ती त्यांच्याकडे आली. या व्यक्तीने त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलित करून त्यांचा मोबाइल हिसकावला. यावेळी बलकवडे यांनी प्रतिकार केला असता, चोरट्याने त्यांना मारहाण करून मोबाइल लुटून पळ काढला.
याच घटनेच्या काही दिवस अगोदर सेक्टर १७मध्ये मथीवानन गोपालराजू (६०) यांनाही मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांनाही मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने पत्ता विचारून बोलण्यात गुंतवून मोबाइल हिसकावून पळ काढला. दोन्ही घटनांप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलग घडलेल्या दोन्ही घटनांमुळे परिसरात ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.