वृध्दाला उडवून झाला होता पसार; बाइक स्टंटमॅनला अवघ्या दोन तासांमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:16 PM2019-04-22T16:16:43+5:302019-04-22T16:18:49+5:30
ठाणे - वृद्धाला उडवून पसार झालेल्या तरूणाला पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केल्याची घटना रविवारी घडली. त्याची मोटारसायकल जप्त केल्याचे ...
ठाणे - वृद्धाला उडवून पसार झालेल्या तरूणाला पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केल्याची घटना रविवारी घडली. त्याची मोटारसायकल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट, इटर्निटी मॉलच्या बसस्टॉपसमोरील रस्त्यावरून धर्मा शिर्के (६८) हे २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांना तनुज सावंत (२०, रा. नौपाडा, ठाणे) या स्टंटबाज मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक देऊन पलायन केले होते. त्याचवेळी तिथे गर्दी झाल्यामुळे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने तिथे चौकशी केली. तेव्हा, मोटारसायकलच्या धडकेमुळे शिर्के हे गंभीर जखमी झाल्याचे आढळले. त्यांच्या दोन्ही पायांची हाडे तुटल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने आधी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात, नंतर कळवा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची गांभीर्यता पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोटे यांच्या पथकाने वागळे इस्टेट परिसरात स्टंटबाजी करत मोटारसायकल चालवणाऱ्यांची माहिती घेतली.
सोशल मिडियाच्या आधाराने अनेकांची चौकशी केली. सखोल चौकशीअंती वागळे इस्टेट धर्मवीरनगर येथील मोटारसायकलस्वाराने यातील स्टंट करणाºया तरुणाला ओळखले. त्यानुसार, नौपाड्यातील जयानंद सोसायटीतून तनुज सावंत याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने हा अपघात आपणाकडून झाला असून त्यानंतर आपण पलायन केल्याचीही कबुली दिली. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. अपघाताचा कोणताही सुगावा नसताना नवीन तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये सावंतला जेरबंद केले.
सोशल मीडियावर फोटो करायचा अपलोड
तनुजला वेगवेगळ्या मोटारसायकलवर स्टंटबाजी करण्याची सवय आहे. स्टंटबाजी करताना फोटो काढून तो फेसबुकवर टाकायचा. त्याचे असेच काही फोटो तपास पथकाच्या हाती लागले. मोटारसायकली मात्र वेगवेगळ्या होत्या. याच फोटोंच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.