बाबो! सौदी राजकुमारीच्या घरात चोरी झाली; जडजवाहीर गेल्याचे कळताच चक्कर आली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 03:58 PM2020-11-07T15:58:04+5:302020-11-07T16:00:04+5:30
Saudi Princes : गेल्या ऑगस्टपासून सौदीची 47 वर्षीय राजकुमारी घराकडे फिरकलेली नाही. तिच्या घरामध्ये लाखो रुपयांचे हार, घड्याळे, दागिने आदी होते. या साऱ्या मौल्यवान वस्तूंची किंमत €600,000 युरो होती.
सौदीच्या राजकुमारीच्या घरात चोरी झाली आहे. राजकुमारी घरात नसताना चोरांनी घरातील कोट्यवधींचे सामान चोरून नेले आहे. सौदीच्या राजकुमारीच्या पॅरिसमधील घरात ही चोरी झाली आहे.
गेल्या ऑगस्टपासून सौदीची 47 वर्षीय राजकुमारी घराकडे फिरकलेली नाही. तिच्या घरामध्ये लाखो रुपयांचे हार, घड्याळे, दागिने आदी होते. या साऱ्या मौल्यवान वस्तूंची किंमत €600,000 युरो होती. राजकुमारी जेव्हा घरी आली तेव्हा घरफोडी झाल्याचे समजले. आत जाऊन घरातील मौल्यवान वस्चूंची पाहणी केली, तर ते गायब असल्याचे आढळले. ही चोरी हाय प्रोफाईल असल्याने पॅरिसचे पोलिसही कामाला लागले. त्यांनी प्रत्येक चोरट्याची धरपकड करण्यास सुरुवात केली.
या चोरीचा धसका राजकुमारीने घेतला असून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या धक्क्यातून ती न सावरल्याने तिने अद्याप पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही. या प्रकरणी बटाक्लानच्या बँक्सी आर्टवर्क येथून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या राजधानीमधील पॉश एरियात असलेल्या जॉर्ज अव्हेन्यूमधील अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला होता.
सौदीच्या राजकुमारीकडे दोन हर्मीस बॅग होत्या. या बॅगची किंमत 10000 ते 30000 युरो होती. याशिवाय़ मौल्यवान घड्याळे आणि दागदागिने होते. तसेच फरची प्रावरणे देखील होती. राजकुमारीच्या इमारतीमध्ये ऑगस्टपासून एक व्यक्ती राहण्यास आला होता. त्यानेच ही चोरी केल्याचे ली पॅरिसिअन वृत्तपत्राने म्हटले आहे. तर राजकुमारीच्या घराच्या स्पेअर किल्ल्यादेखील हरवल्या आहेत.