बापरे! थोड्या थोडक्या नव्हेत, ५००० हून अधिक कार; देशातील सर्वात मोठ्या चोराला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:53 PM2022-09-05T14:53:00+5:302022-09-05T14:53:37+5:30
एखादा चोर आयुष्यात किती कार चोरू शकतो? पाच-दहा पंधरा... कधी ना कधी तो पकडला जातच असेल ना...बाकीचे आयुष्य तुरुंगात आणि सुटला तर पोलिसांच्या संशयात...
एखादा चोर आयुष्यात किती कार चोरू शकतो? पाच-दहा पंधरा... कधी ना कधी तो पकडला जातच असेल ना...बाकीचे आयुष्य तुरुंगात आणि सुटला तर पोलिसांच्या संशयात जात असेल. पण दिल्ली पोलिसांना देशातील सर्वात मोठ्या कार चोराला पकडण्यात यश आले आहे.
अनिल चौहान असे या महाचोराचे नाव आहे. त्याच्यावर गेल्या २७ वर्षांत ५००० हून अधिक कार चोरण्याचा आरोप आहे. त्याचबरोबर अनिलवर खून, आर्म्स अॅक्ट आणि तस्करीचेही गुन्हे नोंद आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अनिल चौहानला आसाममधून अटक केली आहे. 1990 च्या दशकात त्याने सर्वाधिक मारुती ८०० चोरल्या होत्या. तो या चोरीच्या गाड्या जम्मू-काश्मीर, नेपाळ आणि ईशान्य भारतात विकत होता.
अनिल हा १९९० मध्ये दिल्लीच्या खानपुरमध्ये राहत होता. तो रिक्षा चालवायचा. यानंतर तो गुन्ह्यांच्या दुनियेत आला आणि बादशाह बनला. त्याने कार चोरीतून प्रचंड मालमत्ता गोळा केली आहे. ही संपत्ती दिल्ली, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये असल्याचे सांगितले जाते. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अलीकडच्या काळात तो शस्त्रांची तस्करी करत होता.
आसाम पोलिसांनी अनिल चौहानला ७ वर्षांपूर्वी अटक केली होती. त्याच्यावर आसाम, दिल्ली, महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतून साडेचार हजारांहून अधिक गाड्या चोरल्याचा आरोप होता. अनिलनेही तेव्हा ४५५२ गाड्या चोरून विकल्याचा गुन्हा कबूल केला होता. तेव्हा त्याच्यावर देशभरात साडेतीन हजार गुन्हे दाखल होते.