दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्याने पाच तोळे सोने केले लंपास
By पंकज पाटील | Published: October 4, 2023 07:30 PM2023-10-04T19:30:25+5:302023-10-04T19:32:14+5:30
भूल घालून दागिने पळवून नेल्याची धक्कादायक घटना
पंकज पाटील/अंबरनाथ: अंबरनाथ एमआयडीसीला लागून असलेल्या गोरपे गावातून एक आश्चर्यचकित करणारी चोरीची घटना उघडकीस आली आहे. गोरपे गावात राहणऱ्या शोभा पाटील या आजीबाईंची फसवूनक करून तब्बल पाच तोळे सोन पितांबरीचे मार्केटिंग करण्यासाठी आलेल्या दोन भामट्यांनी लंपास केले. घरातील भांड्यांना फ्री मध्ये पॉलिश करून देतो अशी बतावणी करून आधी घरातील भांड्यांना पॉलिश करून दिली.
त्यानंतर शोभा पाटील यांचा विश्वास संपादन केल्यानतर त्यांच्या सुनेच्या पायातील पैंजण देखील पॉलिश करून दाखवले आणि चकचकीत झालेले भांडे आणि पैंजण पाहून त्यांना विश्वास बसला. त्यानंतर या दोन भामट्यांनी आम्ही दागिने देखील पॉलिश करून देतो अशी बतावणी केली. त्यांच्या या बतवणीला भुलून शोभा पाटील यांनी आपले पाच तोळे दागिने या भामट्यांकडे दिले आणि या दोघांनी हे दागिने पितांबरी आणि सोडा टाकून एका प्रेशर कुकरमध्ये त्याच्या दोन शिट्ट्या होऊ द्या असं सांगितले आणि तिथून निघून गेले. सांगितल्याप्रमाणे दोन शिट्ट्या झाल्यानंतर आजीबाईंनी प्रेशर कुकर उघडून पाहिला तर त्यामधील चक्क दागिनेच गायब असल्याच दिसून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असून त्या भामट्यांनीच आपले दागिने भूल पाडून लंपास केल्याची गोष्ट आजीबाईंच्या लक्षात आली त्यानंतर आजीबाई थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिसांकडून या दोन भामट्यांचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.