पत्नीची पर्स चोरल्याच्या संशयावरुन दोघांना घरात ठेवले डांबून, आरोपीला अटक
By मुरलीधर भवार | Published: February 4, 2023 05:07 PM2023-02-04T17:07:39+5:302023-02-04T17:07:57+5:30
हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत.
कल्याण : पत्नीची पर्स चोरी केल्याच्या संशयावरून आरोपीने दोन प्रवाशांचे अपहरण करुन त्यांना घरात डांबून ठेवले. तसेच, त्या दोघांकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी अपहरण करण्यात आलेल्या दोन जणांच्या नातेवाईकांनी मुंबई नागपाडा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ तपास करुन आरोपी अझर शेख याला अटक केली आहे. डांबून ठेलेल्या दोन जणांनी सुटका केली आहे. हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत.
अझर शेख हा आपल्या पत्नीसह जयनगरहून मुंबईकडे पवन एक्सप्रेसने येत होता. तो व त्याची पत्नी ज्या बोगीतून प्रवास करीत होते. त्याच बोगीत सज्जात शेख आणि सजिद शेख हे दोघे प्रवास करीत होते. अझर याच्या पत्नीची प्रवासा दरम्यान पर्स चोरीस गेली. चोरीस गेलेल्या पर्समध्ये पैसे होते. दरम्यान, पर्स ही साजिद आणि सज्जात शेख या दोघांनी चोरी केल्याचा संशय अझरला होता. या संशयामुळे त्याने या दोघांना कल्याण स्थानकात उतरविले. त्या दोघांना तो त्याच्या भिवंडी येथील घरी घेऊन गेला. दोघांना त्याने घरात दोन दिवस डांबून ठेवले आणि सुटकेसाठी त्यांच्या घरच्या मंडळींकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली.
साजिद आणि सज्जात शेख या दोघांचे अपहरण झाल्याने त्याच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी केली जात असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी मुंबई नागपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी अझरला अटक केली. त्याच्या घरातून साजिद आणि सज्जात शेख या दोघांची सुटका केली. पोलिसांनी हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.