पुन्हा गुजरात: वैद्यकीय चाचणीसाठी 100 ट्रेनी महिला कर्मचाऱ्यांना केले विवस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 11:28 AM2020-02-21T11:28:42+5:302020-02-21T11:31:15+5:30
गेल्या आठवड्यातच गुजरातच्या भूज जिल्ह्यामध्ये मुलींच्या हॉस्टेलमध्ये मासिक पाळी शोधण्यासाठी 68 विद्यार्थिनींना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता हा आणखी मोठा प्रकार उघड झाला आहे.
सुरत : गेल्या आठवड्यातच गुजरातच्या भूज जिल्ह्यामध्ये मुलींच्या हॉस्टेलमध्ये मासिक पाळी शोधण्यासाठी 68 विद्यार्थिनींना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावरून मोठा गदारोळ झाला होता. आता पुन्हा त्याच गुजरातमध्ये सुरत महापालिकेच्या ट्रेन महिला कर्मचाऱ्यांसोबत सारखाच प्रकार घडला आहे. धक्कादयक म्हणजे काही अविवाहित महिलांना आक्षेपार्ह प्रश्नही विचारण्यात आले आहेत.
हे नवे प्रकरण राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सुरत महापालिकेच्या एका हॉस्पिटलमधील आहे. एसएमसी कर्मचारी संघाने याची तक्रार महापालिका अधिकाऱ्याकडे केल्याने या प्रकाराची वाच्यता झाली आहे. महापालिकेच्या 100 ट्रेनी महिला कर्मचाऱ्यांना एका आवश्यक फिटनेस टेस्टसाठी सुरत शहर आयुर्विज्ञान आणि संशोधन संस्थेमध्ये नेण्यात आले होते. यावेळी या महिला ट्रेनी क्लर्कना 10-10 च्या गटाने निर्वस्त्र उभे राहण्यास सांगण्यात आले. यावेळी त्यांच्या खासगी आयुष्यावरही प्रश्न विचारण्यात आले.
एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्हाला अशा ठिकाणी निर्वस्त्र उभे करण्यात आले होते की त्या खोलीचा दरवाजाही नीट बंद करण्यात आलेला नव्हता. खोलीमध्ये केवळ एक पडदा लावलेला होता. वादग्रस्त फिंगर टेस्टसह महिलांसोबत अभद्र व्यवहार करण्यात येत होता. त्यांना खासगी सेक्शुअल आयुष्यावरही प्रश्न विचारण्यात आले. तर काही अविवाहित असलेल्या महिलांना तेथील महिला डॉक्टरांनी तुम्ही गर्भवती झालेला का, असा प्रश्नही विचारला. या डॉक्टरांवर घाणेरडेपणाचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
या साऱ्या प्रकरणावर हॉस्पिटलचे स्री रोग विभाग प्रमुख आश्विन वछानी यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महिलांची शारीरिक तपासणी गरजेची आगे. पुरुषांची अशा पद्धतीची तपासणी केली जाते की नाही माहिती नाही. मात्र, महिलांसाठी या नियमांचे पालन करावे लागते. यामध्ये कोणत्या महिलेला रोग तर नाही ना हे पाहिले जाते.
खळबळजनक!... म्हणून ६८ विद्यार्थिनींना चक्क कपडे उतरवायला केली बळजबरी
छोट्याशा जागेतही कार कशी पार्क करता येते? आनंद महिंद्रांकडून स्तुती
मरांडी यांच्यापाठोपाठ शत्रुघ्न सिन्हांची होणार भाजपमध्ये घरवापसी ?