संशयित बोटीत सापडलेल्या बेकायदेशीर ३५० लीटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:52 PM2022-09-27T19:52:31+5:302022-09-27T19:53:58+5:30
करंजा-उरण येथील बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना एक संशयित मच्छीमार बोट आढळून आली होती.
मधुकर ठाकूर
उरण : करंजा बंदरातून सोमवारी ताब्यात घेतलेल्या संशयित बोटी प्रकरणी १२ तासांच्या चौकशीनंतर बेकायदेशीर ३५० लीटर डिझेल बाळगण्याचा ठपका ठेवून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अकबर इस्माईल शेख रा.मनिष मार्केट-मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सुनील पाटील यांनी दिली.
करंजा-उरण येथील बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना एक संशयित मच्छीमार बोट आढळून आली होती. नाव,नंबर, कागदपत्रे नसलेली ही संशयित मच्छीमार बोट सोमवारी (२६) उरण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली होती. कस्टम, पोलिस, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकाऱ्यांकडून या गंभीर घटनेची तब्बल १२ तास चौकशी सुरू होती.दरम्यान मालकाच्या एका हस्तकामार्फत बोटीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.या कागदपत्रांनुसार सहा सिलेंडरची ही साईसागर बोट सन १९८७ साली नायगाव वसई येथे बांधण्यात आली होती.त्यानंतर ती बोट श्रवण कुमार वासुदेव कनोजिया रा.शिवाजी नगर- गोवंडी यांना २०१७ मध्ये विकण्यात आली होती. या बोटींची येथील ससुनडॉक बंदरात नोंदणी करण्यात आली आहे.त्यानंतर ही बोट मोहन जभाजी वराळे रा.ससुनडॉक-मुंबई यांना भाड्याने देण्यात आली आहे.
नादुरुस्त झाल्याने ही बोट करंजा येथील बंदरात आणण्यात आली होती. या बोटीचा वापर तस्करीच्या मार्गाने डिझेल विक्रीसाठी करण्यात येत असावा या संशयातून सोमवारी बोट चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली होती. कागदपत्राची तपासणी आणि इतर चौकशीनंतर या बोटीचे निर्दोषत्व सिध्द झाले आहे.मात्र बोटीत बेकायदेशीरपणे ३५० लिटर डिझेल आढळून आल्याप्रकरणी उरण तहसील पुरवठा अधिकारी सोमलिंगा बिराजदार यांच्या तक्रारीनंतर अकबर इस्माईल शेख रा.मनिष मार्केट-मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वपोनि सुनील पाटील यांनी दिली.तर बोटीच्या मालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या सत्यतेची पडताळणी केली जात असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे यांनी दिली.